रोहा-तांबडी रस्ता जीवघेणा
पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना, अपघातांची भीती
रोहा, ता. ५ (बातमीदार) ः सतत पडणाऱ्या पावसामुळे रोहा-तांबडी मुख्य जिल्हा मार्ग क्रमांक ५० वरून प्रवास करणे धोक्याचे ठरत आहे. सहा महिन्यांच्या कालावधीत सात ते आठ ठिकाणी मातीसह मोठे दगड रस्त्यावर कोसळले आहेत. त्यामुळे हा मार्ग जीवघेणा ठरण्याची शक्यता आहे.
रोहा-तांबडी रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने धावतात. या मार्गावरील जवळपास पाच किलोमीटरचा परिसर डोंगराळ आहे. अनेक ठिकाणी नागमोडी वळणे आहेत. या रस्त्याचा कामासाठी साडेचार कोटींच्या कामाची निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्चमध्ये प्रसिद्ध केली; मात्र हा प्रस्ताव अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. जून-जुलैमध्ये रस्ते दुरुस्तीचे अंदाजपत्रक पाठवण्यात आले आहे; मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याने प्रशासकीय दिरंगाई मोठ्या अपघाताला निमित्त ठरण्याची शक्यता आहे.
------------------------------------------
ग्रामीण भागांना जोडणारा मार्ग
तळा, मुरूड, म्हसळा, श्रीवर्धन तसेच अनेक ग्रामीण भागांना जोडणारा महत्त्वाचा जिल्हा मुख्य मार्ग आहे. त्यामुळे स्थानिक नव्हेतर संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्याच्या वाहतुकीवर रस्त्याच्या दुरवस्थेचा परिणाम होत आहे. या रस्त्यावर दोन साकव, संरक्षण भिंत व कच्चे गटार बांधण्याची योजना आहे; मात्र मंजुरीअभावी काम रखडल्याने रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.
-----------------------------
नेतेमंडळींनी आवाहन
रोहा शहरात कोट्यवधींची विकासकामे धडाक्यात सुरू आहेत. विकासाच्या नावाने मोठे प्रकल्प दाखवले जात असताना ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा दुर्लक्षित आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नऊ ठिकाणी डोंगर भाग कोसळलेला आहे. दोन ते तीन हजार किलो वजनाचे दगड लटकलेल्या अवस्थेत आहेत. सोशल मीडियावर विकास दाखवणारे नेतेमंडळींनी येथून प्रवास करावा, असा रोष नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
------------------------------
अतिवृष्टीमुळे माती जागा सोडत आहे. त्यामुळे दगड खाली येत आहेत. पावसामुळे या ठिकाणी काम करणे धोक्याचे आहे. डोंगराळ भागात असलेली धोकादायक झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढण्यात आली आहेत.
- विजय बागुल, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, रोहा