दिनेश गोगी : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. ५ : मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे बहुतेक रस्ते खड्डेमय झाले आहे. महापालिकेने खड्डे भरण्याचे प्रयत्न केले असले, तरी १०० टक्के यश आलेले नाही. त्यातच काही रस्त्यांवर काम करताना राहिलेले गॅप्स नागरिकांसाठी नव्या संकटाचे कारण ठरत आहेत. या उखडलेल्या रस्त्यांमुळे रिक्षाचालक, प्रवासी आणि दुचाकीस्वारांना केवळ त्रासच नव्हे, तर कंबर आणि मणकेदुखीच्या समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहेत.
शहरात रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम पश्चिम भागात गतीने सुरू असले, तरी पूर्व भागात त्याचा वेग कमी असल्याने नागरिकांकडून तक्रारी वाढल्या आहेत. रस्त्यांच्या या दुरवस्थेमुळे वाहनांच्या अनेक भागांमध्ये बिघाड होत आहे. दुरुस्तीचा खर्च वाहन मालकाच्या खिशावर भार टाकत आहे. आयुक्त मनीषा आव्हाळे आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, अजय साबळे, विशाल कदम आणि अलका पवार यांच्या उपस्थितीत उकडत्या मास्टिक अस्फाल्टने खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम सर्व भागांत समान वेगाने करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे. शहरातील रस्ते दुरुस्त करताना ठेवलेले गॅप रिक्षा, दुचाकी, रॅपिडो व ओला वाहनांसाठी धोकादायक ठरत आहेत. या ठिकाणी वाहनांना जोराचे धक्के बसत असल्याने प्रवाशांच्या मानेला आणि कमरेला झटके बसत आहेत. खड्यांमुळे दुचाकी घसरून अपघात होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत.
रस्त्यांवरील खड्डे आणि गॅपमुळे कंबर व मणकेदुखीचे रुग्ण वाढले आहेत. शहरातील अनेक हाडांच्या डॉक्टरांकडे अशा रुग्णांची संख्याच वाढली आहे. पडून जखमी झालेल्या काही रुग्णांना फॅक्चरही झाले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून नागरिकांना शारीरिक आणि आर्थिक दोन्ही त्रास सहन करावा लागत आहे.
डॉ. प्रकाश नाथानी, अध्यक्ष आणि हाडांचे तज्ज्ञ, इंडियन मेडिकल असोसिएशन
गेल्या ४० वर्षांत रस्त्यांचे एवढे वाईट चित्र प्रथमच पाहत आहे. टायर पंक्चर होणे, शॉकस्प्रिंग व इतर पार्ट निकामी होणे ही रोजचीच गोष्ट झाली आहे. गॅरेजच्या फेऱ्या माराव्याच लागतात.
महेश सोनवणे, रिक्षाचालक
महापालिकेचे उत्तर
विभागाच्या कामांदरम्यान काही गॅप राहिले असतील, तर संबंधित ठेकेदाराला तातडीने ते भरून काढण्याच्या सूचना देण्यात येतील, अशी प्रतिक्रिया रस्त्यांवरील गॅपविषयी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुले यांना विचारल्यावर दिली.
उल्हासनगर : रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना कंबर आणि मणकेदुखीच्या व्याधी वाढल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.