‘एशियाटिक’च्या प्रचाराने धरला वेग
मतदार यादीतील घोळ न मिटल्याने दोन्ही पॅनेल चिंतेत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ ः अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीसाठी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही पॅनेल प्रयत्नशील आहेत. माजी राज्यसभा सदस्य कुमार केतकर आणि विनय सहस्रबुद्धे यांच्यात अध्यक्षपदाची चुरस रंगली आहे; मात्र अजूनही मतदार याद्यांचा घोळ कायम असल्याने त्याचा फटका दोन्ही पॅनेलला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही गटांत धाकधूक वाढली आहे.
गिरगावच्या मराठी साहित्य संघाच्या धर्तीवर एशियाटिक सोसायटीत काँग्रेस विरुद्ध संघ विचारांच्या पॅनेलमध्ये थेट लढत आहे. अखेरच्या टप्प्यात धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयामुळे २७ नोव्हेंबरपर्यंत सदस्यत्वासाठी अर्ज केलेल्यांनाच मतदानाची संधी मिळणार आहे. या निर्णयामुळे केतकर पॅनेलमध्ये चिंता वाढली असली, तरी बाद झालेल्यांमध्ये संघ विचारसरणीच्या अनेकांचा समावेश आहे. सोसायटीचे एकूण तीन हजारांहून अधिक सदस्य असून, यात नव्याने झालेल्या ३०० हून अधिक सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे; मात्र अनेकांची नावे मतदार यादीत नसल्याने सहस्रबुद्धे पॅनेलमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
----
दोन्ही पॅनेलने आखली रणनीती
१. केतकर पॅनेल
अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी समाज माध्यम आणि दूरध्वनीद्वारे संपर्क साधला जात आहे. केतकर पॅनेलमध्ये अभ्यासक, संशोधक, चळवळीतील कार्यकर्ते तसेच प्रशासकीय अनुभवी व्यक्तींचा समावेश असल्याने अनेक जुने सदस्य मतदान करतील, असा विश्वास केतकर यांच्या गटाला आहे. एशियाटिकच्या निवडणुकीत मतदासाठी प्रत्यक्ष केंद्रावर उपस्थित राहावे लागणार असल्याने या प्रक्रियेचा फायदा होईल, अशी अपेक्षा केतकर पॅनेलला आहे. शिवाय, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर सकारात्मक निर्णय झाल्यास चित्र पालटू शकते.
२. सहस्रबुद्धे पॅनेल
धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयामुळे विनय सहस्रबुद्धे पॅनेलमध्ये उत्साह वाढला आहे. निवडणूक व्यवस्थापनासाठी एक स्वतंत्र टीम काम करीत आहे. प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्याची मोहीम सुरू आहे. समाज माध्यमांवर सहस्रबुद्धे यांच्याकडून आवाहन केले जात आहे. संघाशी निगडित ‘मुक्टा’ शिक्षक संघटनेसह काही संस्था प्रचारात उतरल्या आहेत. मतदार यादीतील घोळ संपल्यास नव्या मतदारापैकी बहुतांश मतदारांना मतदानासाठी आणण्याची तयारी पॅनेलने केली आहे. त्या पद्धतीचे नियोजनही सहस्रबुद्धे पॅनेलने केल्याचे कळते.
....
धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले आहे. सकारात्मक निर्णय लागण्याची अपेक्षा आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे फारसे बोलणे योग्य नाही.
- कुमार केतकर, अध्यक्षपदाचे उमेदवार
....
एशियाटिक संस्थेला निवडणुकीचे नियोजन करणे गरजेचे आहे. लोकशाहीनुसार सर्वांना मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे. धर्मादाय आयुक्तांच्या निर्देशाचे पालन झाल्यास आमच्या पॅनेलचा विजय निश्चित आहे.
- विनय सहस्रबुद्धे, अध्यक्षपदाचे उमेदवार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.