मोठागावची कोंडी फुटणार
रेल्वे फाटकावर चार पदरी उड्डाणपुलाला गती
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ६ : मोठागाव रेल्वे फाटकावरील रेल्वे उड्डाणपुलाचा प्रस्ताव बदलत दोन पदरीऐवजी चार पदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर रेल्वे प्रशासनाने अखेर या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. ठाणे-मुंबईकडे जाणाऱ्या वाढत्या वाहतुकीच्या भाराचा विचार करून हा बदल करण्यात आला आहे. या प्रकल्पास गती मिळून शहरातील वाहन कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
माणकोली उड्डाणपुलावरून ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पनवेलकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक जाते. सध्या हा मार्ग वापरण्यासाठी वाहनांना मोठागाव रेल्वे फाटकातून जावे लागते. दिवा-वसई, वसई-पनवेल या महत्त्वाच्या रेल्वेमार्गावर हे फाटक असून, येथे सातत्याने मेल एक्सप्रेस धावत असल्याने वाहनांना दीर्घ काळ फाटक उघडण्याची प्रतीक्षा करावी लागते. शिवाय हा रस्तादेखील अरुंद असल्याने फाटक बंद झाल्यावर दोन्ही दिशेला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात आणि रेल्वेमार्गिका ओलांडतानादेखील वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. प्रस्तावित उड्डाणपुलामुळे ही अडचण पूर्णपणे सुटणार असल्याचा दावा केला जात आहे.
फाटक कायमचे बंद करून येथे उड्डाणपूल उभारण्यात यावा याविषयीच्या प्रस्तावाला रेल्वे प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. पालिका प्रशासनाने या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडे निधीची मागणी केली होती. सरकारने पुलासाठी १६८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. साधारण दोन वर्षांपूर्वी महापालिकेने येथे दोन पदरीऐवजी चार पदरी पूल उभारणीचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे पाठविला होता, परंतु रेल्वे प्रशासनाकडून त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर रेल्वेने यास मान्यता दिली आहे. ठाणे-मुंबईकडे जाणाऱ्या वाढत्या वाहतूक भाराचा विचार करून हा बदल केल्याचे सांगण्यात येत आहे.
माणकोली उड्डाणपुलाशी जोडल्या जाणाऱ्या या रेल्वे उड्डाणपुलाच्या पूर्णत्वानंतर तासाभराचा कालावधी वाहनांचा वाचणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडे मागणी केली होती. सरकारने या पुलासाठी १६८ कोटींचा निधी मंजूर केला आहे.
मंजूर निधीचे विभाजन
कामाचा प्रकार मंजूर निधी
२४ मी. रस्त्याचे भूसंपादन ७२.७५ कोटी
पुलाचे बांधकाम ५.५८ कोटी
पोहोच रस्ते ८४ कोटी
देवीचापाडा मंदिराजवळ बोगदा ३ कोटी
नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद
उड्डाणपुलाची रुंदी वाढवण्याची मागणी नागरिकांनी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी वारंवार केली होती. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख तथा माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी चार पदरी पुलासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
डोंबिवली ठाणे मार्गावरील मोठागाव येथील रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाचे काम लांबले होते. भविष्यात वाढणाऱ्या वाहतूक भाराचा विचार करून दोनऐवजी चार पदरी उड्डाणपूल व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. यातील ६०० बाधितांना ६८ कोटींची भरपाई दिली जाणार आहे. काम लवकर सुरू व्हावे यासाठी रेल्वेशी संपर्कात आहे.
- दीपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख, ठाकरे गट
बाधितांसाठी स्वतंत्र भरपाई निधी
सरकारने पुलासाठी १६८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतील भूसंपादनासाठी ३० कोटी, या पुलाच्या पोहोच रस्त्यामुळे बाधित होणाऱ्या ६०० बाधित रहिवाशांच्या पुनर्विकासासाठी १३८ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. पालिकेने प्रथमच बाधितांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर थेट आर्थिक भरपाईची तरतूद केली आहे. यापूर्वी अशा प्रकल्पांमध्ये फक्त टीडीआर दिले जात होते.
प्रकल्पाचे फायदे
- मोठागाव रेल्वे फाटकावरील कोंडी दूर
- डोंबिवली-पश्चिम ते ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई मार्ग अधिक वेगवान
- आपत्कालीन सेवांना (ॲम्ब्युलन्स/फायर ब्रिगेड) वेळेवर मार्ग उपलब्ध
- वाढत्या वाहतुकीचा दीर्घकालीन विचार
आता पुढील टप्पा
- तांत्रिक मान्यता मिळाली आहे.
- भूसंपादन प्रक्रयिा तातडीने सुरू होणार
- कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.