उड्डाणपुलांची चढण धोकादायक
घोडबंदर रोडवर सर्वाधिक अपघात
ठाणे शहर, ता. ६ (बातमीदार) ः हलक्या वाहनांसह जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा घोडबंदर मार्ग अपघातांचे केंद्र ठरू लागला आहे. एकाच वेळी या मार्गावर विविध कामे सुरू असून सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. वाहनचालकांना यातून मार्ग काढणे कठीण झाले आहे. अशातच मार्गावरील उड्डाणपुलांच्या चढणीचे ठिकाण जड-अवजड वाहनांच्या गंभीर अपघाताला कारणीभूत ठरू लागले आहेत.
घोडबंदर मार्गावरील वाहतुकीत सर्वात जास्त वाहतूक जड-अवजड वाहनांचा समावेश असतो. उरणमधील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमधून रोज ५०-६० हजार जड-अवजड वाहने कंटेनर लादून या मार्गाने पालघर, गुजरातला जातात. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होते, ती टाळण्यासाठी जड-अवजड वाहनांना रात्री वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे; मात्र मार्गावर असलेला रात्रीचा अंधार आणि उड्डाणपुलांचे चढणीचे ठिकाण या वाहनांच्या अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. दर तीन-चार दिवसांनी अशा ठिकाणी एकतरी अपघात झाल्याची घटना घडते. रात्रीची वेळ असल्याने पुलाजवळचा चढणीचा भाग चालकाच्या लक्षात येत नाही. त्यामुळे ही वाहने चढणीच्या दुभाजकावर चढून अपघात होतात.
वाहनांमध्ये प्रचंड वजनाचा माल असल्याने होणाऱ्या अपघाताची तीव्रता जास्त असते. वाहन थेट दुभाजकाच्या भिंतीवर लांबपर्यंत जाते. ही भिंत लोखंड आणि सिमेंट काँक्रीटने तयार केलेली असल्यामुळे वाहनांचे इंजिन, डिझेल वाहिनी आणि चालकाच्या केबिनचे प्रचंड नुकसान होते. अनेकदा ही वाहने पलटी होतात. इंजिनला मोठे नुकसान झाल्याने वाहन बंद पडते. अशावेळी मोठ्या वजनाचे हे वाहन बाजूला काढून रस्ता वाहतुकीला मोकळा करून देण्यासाठी वाहतूक पोलिसांना मोठे परिश्रम घ्यावे लागतात. त्यामुळे ठाणे महापालिकाने या ठिकाणी सिग्नल बसवणे आवश्यक असल्याचे वाहतूक विभागाचे म्हणणे आहे.
या ठिकाणी होतात अपघात :
तीन हात नाका, नितीन कंपनी, माजिवडा, मानपाडा, पातलीपाडा, वाघबीळ, कासारवडवली, लोढा
तारेवरची कसरत
अपघातग्रस्त वाहन बाजूला काढण्यासाठी वाहतूक विभागाला तारेवरची कसरत करावी लागते. त्यासाठी हायड्रा, मल्टी एक्सल ट्रक, क्रेन आदींचा वापर करावा लागतो. काही वेळातच एक लाइन वाहतुकीसाठी मोकळी करून द्यावी लागते. काही मिनिटांतच वाढलेली वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी या मार्गावरील सगळ्या वाहतूक कर्मचाऱ्यांची दमछाक होते.
सिग्नल बसविण्यास टाळाटाळ
उड्डाणपुलांच्या चढणीच्या ठिकाणी सिग्नल, झेब्रा पट्टे, रिफ्लेक्टर, रेडियमचे पट्टे, स्प्रिंकल ट्रॅफिक बोलार्ड (लाल रंगाचे प्लॅस्टिक खांब) आदी साहित्य बसविले जाणे आवश्यक आहे. पातलीपाडा हा अपघाताचा डेंजर झोन झाला असल्याने येथे सिंगल सिग्नल बसवणे अत्यंत आवश्यक आहे.
अवजड वाहनांचे अपघात :
२ ऑगस्ट - पातलीपाडा
२ सप्टेंबर - पातलीपाडा
४ सप्टेंबर - पातलीपाडा
४ सप्टेंबर - पातलीपाडा
५ सप्टेंबर - पातलीपाडा
६ सप्टेंबर - मानपाडा
२९ सप्टेंबर - वाघबीळ
३० सप्टेंबर - वाघबीळ
२ नोव्हेंबर - कॅटबरी
३ नोव्हेंबर - पातलीपाडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.