शिंदे-नाईक संघर्षाचा अध्याय रंगणार
गणेश नाईक ठाणे जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : राज्यात भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट सत्तेत एकत्र असले तरी, ठाणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय संघर्ष आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींनंतर भाजपने वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर ठाणे जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणून मोठी जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्तीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था (महापालिका) निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे सेना यांच्यात युती न झाल्यास, ‘दादा विरुद्ध भाई’ असा संघर्षाचा नवा अध्याय रंगण्याची शक्यता आहे.
नाईक यांच्याकडून थेट आव्हान
मंत्री गणेश नाईक हे भाजप पदाधिकाऱ्यांच्या विविध बैठका आणि कार्यक्रमांमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करताना दिसून आले आहेत. ठाण्यातील वर्तकनगर येथे झालेल्या एका बैठकीत गणेश नाईक यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना विधान केले होते की, ‘‘नवी मुंबई महापालिकेत मी पक्षाला सत्ता मिळवून दिली, ठाण्यातही सत्ता मिळवून देऊ शकतो. त्यासाठी रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागेल, तुम्ही तयार आहात का?’’ नाईक यांच्या या विधानावर खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिउत्तर देत टीका केली होती की, ‘‘रावण खलनायक का ठरला? कारण त्याने दुसऱ्याच्या पत्नीचे अपहरण केले. नाईकांनी हे विधान स्वतःबद्दलच केले.’’
स्वबळाचा नारा
भाजपचे आमदार संजय केळकर यांनीही जाहीरपणे शिंदे सेनेला डिवचले आहे. त्यांनी ‘अब की बार ७० पार’ची घोषणा देत ‘स्वबळाचा नारा’ दिला होता. तसेच, ‘ठाणे महापालिकेत भाजपचा महापौर व्हावा, ही ठाणेकर कार्यकर्त्यांची प्रामाणिक इच्छा आहे,’ असे मत व्यक्त केले होते. यानंतर आनंद आश्रमात घेण्यात आलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करीत स्वबळाचा नारा दिला. या पार्श्वभूमीवर, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर गणेश नाईक यांच्या खांद्यावर ठाणे जिल्ह्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी देणे, हा भाजपचा शिंदे गटाला दिलेला थेट राजकीय संकेत मानला जात आहे.
ठाणे शहर निवडणूक प्रमुखपदी केळकर
भाजपने आगामी पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी आमदार संजय केळकर यांच्याकडे दिली आहे. केळकर हे ठाणे पालिकेच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे शिंदे सेनेवर विविध विकासकामांच्या मुद्द्यांवरून (उदा. आरोग्य मंदिर, नाले सफाई, कंत्राटी कामगार) टीका व आंदोलने करीत असतात. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘अब की बार ७० पार’ची घोषणा दिली असून, सर्वच जागांवर कामाला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. या सर्व घडामोडींवरून भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील राजकीय संघर्ष आगामी काळात अधिक तीव्र होणार असल्याचे दिसून येत आहे.
बालेकिल्ल्यात वर्चस्वाची लढाई
शिंदे आणि नाईक यांच्यातील राजकीय शीतयुद्ध प्रामुख्याने ठाणे आणि नवी मुंबई या दोन शहरांतील वर्चस्वासाठी आहे. गणेश नाईक हे मूळचे नवी मुंबईचे असले तरी, ते शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या ठाण्यात (कोपरी) जाऊन सत्कार स्वीकारत आहेत आणि थेट ठाणे शहरात ‘जनता दरबार’ आयोजित करत आहेत, तर एकनाथ शिंदे यांनीही गणेश नाईकांच्या नवी मुंबईमध्ये ‘जनता दरबार’ घेत त्यांना अप्रत्यक्ष आव्हान दिले आहे. त्यामुळे भाजपची रणनीती गणेश नाईकांना ठाण्यात पाठवून एकनाथ शिंदे यांना घेरण्याची आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.