भाईंदर, ता. ६ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरात ७१ बेकायदा कूपनलिका खोदण्यात आल्या आहेत. त्याद्वारे पाणीउपसा करून त्याची व्यावसायिक विक्री केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून हा बेकायदा व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरू आहे. या बेकायदा कूपनलिकांवर तहसीलदार कार्यालयाकडून याआधीच कारवाई होणे अपेक्षित होते, मात्र आतापर्यंत त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. काही दिवसांपूर्वी डाचकूल पाडा येथे दोन गटांत झालेल्या मारहाणीनंतर त्या ठिकाणी सुरू असलेला कूपनलिकांचा बेकायदा व्यवसाय उजेडात आला. आता डाचकूलपाड्यासह शहरातील सर्व बेकायदा कूपनलिकांना अतिरिक्त तहसीलदारांनी नोटिसा बजावल्या असून, व्यवसाय बंद केला नाही, तर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
मिरा-भाईंदर शहरात पाण्याची टंचाई कायमच जाणवते. त्याचा फायदा घेत शहरातील विविध ठिकाणी कूपनलिका खोदण्यात आल्या आहेत. त्यातील पाण्याचा उपसा करून त्याची विक्री केली जात असून, झोपडपट्टीधारकांना प्रति कॅन २० रुपये, तर टँकरसाठी ८०० ते १००० रुपये आकारले जातात. या कूपनलिकातील पाण्याच्या शुद्धतेही कोणतीही तपासणी न करताच त्याची विक्री केली जाते. वास्तविक कूपनलिका खोदण्यासाठी महसूल विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे, तसेच महापालिकेकडून परवाना घेणे बंधनकारक आहे, मात्र कूपनलिका खोदणाऱ्यांनी कोणतीही परवानगी घेतलेली नाही. हा बेकायदा व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यावर कारवाई करण्याचा अधिकार तहसीलदार कार्यालयाला आहे, मात्र आतापर्यंत शहरातील एकाही कूपनलिकेवर कारवाई करण्यात आली नव्हती.
प्रशासनाकडून संयुक्त पाहणी
काही दिवसांपूर्वी डाचकूल पाडा येथे दोन गटांत मारहाणीची घटना घडल्यानंतर त्या ठिकाणची अनधिकृत बांधकामे व अनधिकृत कूपनलिकांचा मुद्दा चर्चेत आला. झोपडपट्टी दादांकडून खुलेआम कूपनलिकांचा व्यवसाय केला जात होता. आयुक्तांनी त्याचा आढावा घेतल्यानंतर अतिरिक्त तहसीलदार नीलेश गौंड यांना डाचकूल पाडासह शहरातील सर्व बेकायदा कूपनलिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर महापालिका व अतिरिक्त तहसीलदार यांनी संयुक्त पाहणी केली होती.
७१ कूपनलिकांना नोटिसा
पाहणीवेळी शहरात सुमारे ७१ बेकायदा कूपनलिका असल्याचे उघड झाले. या सर्वांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात त्यांच्यावर १० हजारांची दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यानुसार आतापर्यंत नऊ कूपनलिकाधारकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. नोटिशीनंतरही कूपनलिका सुरू ठेवल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त तहसीलदार नीलेश गौंड यांनी दिली.
कूपनलिकांचे पाणी गोरगरिबांना मोफत
काही जनांनी कूपनलिका दिसून येऊ नयेत, यासाठी सभोवती बांधकाम केल्याचेही स्पष्ट झाले. ही बांधकामे तातडीने उद्ध्वस्त करून कूपनलिका ताब्यात घ्याव्या व त्यावर महापालिकेने हातपंप बसवून कूपनलिकेचे पाणी गरिबांना मोफत देण्यात यावे, अशा सूचना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.