लठ्ठपणाने ग्रस्त महिलांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका अधिक
आरोग्य विभागाचे सर्वेक्षण; राज्यातील प्रत्येक चौथी महिला त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : महाराष्ट्रात करण्यात आलेल्या अलीकडच्या आरोग्य सर्वेक्षणात राज्यातील प्रत्येक चौथी महिला लठ्ठपणाने ग्रस्त असल्याचे आढळले आहे. रजोनिवृत्ती झालेल्या अशा महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या वाढल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणातून समोर आला आहे. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी डॉक्टरांच्या पातळीवर चर्चा सुरू झाली असून, तज्ज्ञांनी लठ्ठपणाचे प्रमुख कारण मानल्या जाणाऱ्या एनर्जी ड्रिंक आणि फास्ट फूडचे सेवन न करण्याचा सल्ला दिला आहे.
आरोग्य विभागाने केलेले हे सर्वेक्षण १५ ते ४९ वर्षे वयोगटातील महिलांवर आधारित आहे. यात प्रत्येक चौथी महिला लठ्ठपणाने ग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले. लठ्ठपणामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात आणि त्याचा थेट परिणाम स्तनाच्या कर्करोगाच्या जोखमीवर होत असल्याचे संशोधनाने दाखवले आहे.
वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. बोमन डाबर यांनी सांगितले की, आता कमी वयातील महिलांमध्येही स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. शहरीकरण, असंतुलित आहार, स्तनपानाचे प्रमाण घटणे आणि वाढता मानसिक ताण ही कारणे त्यामागे आहेत. बर्गर, पिझ्झा, चायनीज पदार्थ यांसारख्या खाद्यपदार्थांपासून दूर राहणे आवश्यक आहे. डॉ. डाबर म्हणाले, की जर एनर्जी ड्रिंक आणि फास्ट फूडचे सेवनच केले नाही तर निम्म्याहून अधिक लोक कधीच आजारी पडणार नाहीत.
शहरी महिलांमध्ये धोका अधिक
एमओसी कॅन्सर सेंटरचे वरिष्ठ ऑन्कोलॉजिस्ट डॉ. देवेंद्र पाल यांनी सांगितले, की लठ्ठपणा फक्त वजन वाढण्यापुरता मर्यादित नसून, तो शरीरातील इन्सुलिन प्रतिकार, सूज, इस्ट्रोजेन हार्मोन वाढ, मधुमेह आणि फॅटी लिव्हर यांसारख्या स्थिती निर्माण करतो. त्यामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका अनेक पटींनी वाढतो. हा धोका विशेषतः शहरी महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो.
जीवनशैलीचे घटक जबाबदार
डॉ. पाल यांच्या मते, या वाढत्या समस्येमागे जीवनशैलीतील बदल जबाबदार आहेत. उशिरा मातृत्व, कमी गर्भधारणा, असंतुलित आहार आणि व्यायामाचा अभाव ही प्रमुख कारणे आहेत. असंतुलित आहारात विशेषतः फास्ट फूड आणि एनर्जी ड्रिंकचा समावेश आहे. त्यामुळे महिलांनी अशा पदार्थांपासून दूर राहणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.