नवी मुंबईत पाच लाखांहून अधिक वृक्षांचे रोपण
नगरपालिकेचा हरित उपक्रम; सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग
तुर्भे, ता. ८ (बातमीदार) ः पर्यावरण संवर्धन आणि हरित शहराच्या दिशेने नवी मुंबई महापालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. माझी वसुंधरा मोहिमेअंतर्गत मागील पाच वर्षांत नवी मुंबईत तब्बल पाच लाख ६० हजार ३८७ झाडांची लागवड करण्यात आली आहे, अशी माहिती उद्यान विभागाच्या उपायुक्त स्मिता काळे यांनी दिली.
नवी मुंबई महापालिकेच्या विविध विभागांसोबत सामाजिक संस्था, नागरिक आणि स्वयंसेवी संघटनांचा सक्रिय सहभाग या उपक्रमात दिसून येतो. विशेषतः नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि ग्रीन होपसारख्या संस्थांनी मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याचे कार्य केले आहे. पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जागतिक पर्यावरण दिन’ आणि ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली.
‘एक झाड आईच्या नावाने’ या उपक्रमांतर्गत कोपरखैरणे निसर्ग उद्यानात व नेचर पार्कमध्ये ५०० हून अधिक देशी फळझाडे लावण्यात आली. तसेच महापे येथील हनुमान मंदिर टेकडीवर ‘स्वच्छता अपनाएं - बीमारी भगाएं’ अभियानांतर्गतही झाडांची लागवड झाली. नगरपालिका क्षेत्रातील वाशी, तुर्भे, घणसोली, ऐरोली, बेलापूर आणि नेरूळ या विभागांमध्ये देशी प्रजातींचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. जांभूळ, करंज, कडुलिंब, ताम्हण, पिंपळ, पेरू, आंबा यांसारख्या प्रजातींना प्राधान्य देण्यात आले आहे. शिवाय मियावाकी पद्धतीद्वारे दाट वनीकरणाची नवी संकल्पना राबवली गेली आहे.
.............
वर्षनिहाय वृक्षारोपणानुसार २०२१-२२ मध्ये २,१९,९९७, २०२२-२३ मध्ये २,१७,०९१, २०२३-२४ मध्ये ५२,१४८, तर २०२४-२५ मध्ये ७१,१५१ झाडांची लागवड करण्यात आली. या मोहिमेचा उद्देश हवेची गुणवत्ता सुधारणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करणे हा आहे.