मनोर, ता. ६ (बातमीदार) : आंतर जिल्हा बदल्या आणि दिवाळीच्या सुट्टीदरम्यान ऑनलाइन बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे पालघर तालुक्यातील ३८ जिल्हा परिषद शाळा शून्य शिक्षकी ठरल्या आहेत. शिक्षण विभागाकडून दोन अथवा तीन शिक्षक असलेल्या शाळांमधील शिक्षकांना शून्य शिक्षकी शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे नियुक्ती आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे नियोजन कोलमडले असून, दोन शिक्षकांची आवश्यकता असलेल्या शाळांमध्ये एक शिक्षक, तसेच पेसा तत्त्वावरील कंत्राटी शिक्षकांची तात्पुरती नेमणूक करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात मराठी माध्यमातील शिक्षकांची सहा हजार ३२६ पदे मंजूर असताना सर्वाधिक एक हजार १११ पदे रिक्त आहेत. उर्दू माध्यमातील रिक्त पदांची टक्केवारी ३१.५३ टक्के आहे. गुजराती माध्यमातील शिक्षकांच्या मंजूर ४२ पदांपैकी १४ पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागअंतर्गत मराठी, उर्दू, हिंदी आणि गुजराती माध्यमाच्या मंजूर सहा हजार ४९७ पदांपैकी एक हजार १६३ पदे रिक्त आहेत.
पालघर तालुक्यातील शून्य शिक्षकी शाळा
जांबुपाडा, गांजे सागदेव-खडकीपाडा, प्राथमिक शाळा सातपाटी, वरई, दारशेतपाडा, कांद्रेभुरे, विराथन खुर्द, बंदरपाडा-नांदगाव, बंदरपाडा नांदगाव, केळवा आगार नंबर एक, पालीपाडा (दोन शाळा) गावराई, रोठे, किरईपाडा, सातपाटीतील तीन शाळा, चटाळे, नगावे, खार्डी, दांडाखाडी, वाणीपाडा, चिल्हार, मुंडवाळी, कुंभवली, ब्राह्मणपाडा, बेलपाडा, मुंडवाळी, चरीखुर्द, सालवड, पालघर उर्दू शाळा, मानपाडा, विकास नगर, आंबोडे, खोडावेपाडा, तिघरे, खरशेत
नवीन शिक्षक भरती होईपर्यंत आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव घेण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मुदत संपल्यानंतर प्रशासकीय राजवटीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असताना शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले. या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास होण्याची आवश्यकता आहे.
- शिवा सांबरे, माजी शिक्षण सभापती, पालघर जिल्हा परिषद
पालघर जिल्ह्यात ७९ शाळा शून्य शिक्षकी झाल्या आहेत, परंतु संच मान्यतेनुसार जिल्ह्यात कार्यरत ३५० शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. शून्य शिक्षकी शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाईल.
- सोनाली मातेकर, शिक्षणाधिकारी, पालघर जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.