खारघरमधील सिडको भूखंडाला २,१२५ कोटी
ई-लिलाव प्रक्रियेद्वारे भूखंड विक्री, प्रथमच मोठी बोली
नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) ः सिडकोला ५५ वर्षांच्या काळात पहिल्यांदाच निविदेद्वारे विक्रीस काढलेल्या ४२ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाला दोन हजार १२५ कोटी इतकी विक्रमी किंमत मिळली आहे. सिडकोच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या आकाराचा भूखंड ई-लिलावाद्वारे विक्रीस काढण्यात आला होता. खारघर सेक्टर २३ येथील हा भूखंड खरेदी करणारी विकसक कंपनी आकार एस्ट्रॉन यांनी हा भूखंड खरेदी करण्याकरिता, प्रति चौरस मीटर पाच लाख सहा हजार एक रुपया इतकी बोली लावली होती.
सिडकोतर्फे ई-लिलाव प्रक्रियेद्वारे भूखंड विक्री प्रक्रिया राबविली जात असल्याने सिडकोच्या उत्पन्नात अधिक भर पडत आहे. नुकतेच सिडकोने भूखंड विक्री योजना ४६ अंतर्गत निवासी, वाणिज्यिक, बंगला, सेवा उद्योग आणि स्टोरेज व वेअरहाउस वापराकरिता विविध ठिकाणचे एकूण ३० भूखंड विक्रीस काढले होते. त्यापैकी २९ भूखंडांना ई-लिलावाद्वारे प्राप्त झालेल्या बोली सिडकोने १७ ऑक्टोबरला घोषित केल्या; मात्र खारघर सेक्टर २३ येथील भूखंड क्रमांक आठ या ४१,९९४ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाला प्राप्त झालेल्या बोली सिडकोने घोषित केल्या नाही. त्यामुळे सिडको अधिकारी राजकीय दबावापोटी काही ठरावीक विकसकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप ई-लिलाव निविदा प्रक्रियेत सहभाग घेतलेल्या काही निविदाकारांकडून केला जात होता. तर या भूखंडाच्या लिलाव प्रक्रियेला आणखी मुदतवाढ द्यावी, जेणेकरून इच्छुक विकसकांना या निविदा प्रक्रियेत सहभागी होता यावे, याकरिता सिडको अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यात येत असल्याचे आरोप झाले; परंतु सिडको अधिकाऱ्यांनी या एका भूखंडाच्या निविदा प्रक्रियेस मुदतवाढ दिली नसली, तरी या भूखंडाला प्राप्त झालेल्या बोलीदेखील इतके दिवस उघडल्या नव्हत्या. त्यामुळे या निविदेत सहभागी झालेले विकसक आकार एस्ट्रॉन यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन या भूखंडाच्या बोली उघडण्याचे आदेश सिडकोला द्यावेत, अशी मागणी केली. सोमवारी व मंगळवारी या याचिकेवर झालेल्या सुनावणीत सिडको अधिकाऱ्यांनी निविदा दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ऑनलाइन प्रक्रियेत काही अडथळे आल्यामुळे इच्छुक निविदाकार या निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ शकले नाहीत. तसे काही विकसकांचे ई-मेल प्राप्त झाल्याचे सिडको अधिकाऱ्यांनी न्यायालयास सांगितले. सिडकोच्या भूखंडांना चांगली किंमत प्राप्त व्हावी, हा त्यामागचा उद्देश असल्याचेदेखील त्यांचे म्हणणे होते.
अखेर न्यायालयाकडून प्राप्त झालेल्या निर्देशानंतर, तसेच काही विकसकांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेऊन निविदा उघडण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली. या प्रकारावर मुख्यमंत्र्यांकडून नाराजी व्यक्त झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच बुधवारी शासकीय कार्यालयांना सुट्टी असतानाही सिडको अधिकाऱ्यांनी कार्यालयात जाऊन ही प्रलंबित निविदा उघडण्यात धन्यता मानली.
खारघरच्या या अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या भूखंडाला अखेर सिडकोला प्रति चौरस मीटरचा प्राप्त झालेला दर सिडकोच्या अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचे बोलले जात आहे. या एका भूखंड विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत २,१२५ कोटी रुपये जमा होणार आहेत.
या भूखंडाला बोली लावणाऱ्या पहिल्या तीन बांधकाम विकसकांमध्ये मोठी चुरस झाल्याचे दिसून येत आहे. या भूखंडाला द्वितीय क्रमांकाची बोली लावणारे नोबल ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी पाच लाख पाच हजार एक रुपया प्रति चौरस मीटरची बोली लावली होती. तर लोढा डेव्हलपर्स लिमिटेड यांनी पाच लाख एक रुपयाची प्रति चौरस मीटर बोली लावली होती. या भूखंडासाठी ई-लिलाव निविदा प्रक्रियेत एकूण आठ निविदाधारक सहभागी झाले होते. तरीदेखील सिडको या भूखंडाच्या बोली घोषित करीत नसल्याने सिडकोच्या कार्यपद्धतीवर संशयाची पाल चुकचुकत होती.
--
मुदत संपण्याच्या शेवटच्या मिनिटात बोली दाखल
विशेष म्हणजे, खारघर येथील या भूखंडासाठी सर्वोच्च बोली सादर करणाऱ्या पहिल्या तीन निविदाधारकांनी निविदा सादर करण्याच्या अगदी शेवटच्या मिनिटाला तेही शेवटच्या ३० सेकंदामध्ये आपल्या बोली सादर केल्याचे दिसून येत आहे. त्यातही नोबल ऑरगॅनिक यांनी शेवटचे १० सेकंद व आकार एस्ट्रॉन यांनी शेवटचे चार सेकंद शिल्लक असताना ऑनलाइन बोली सादर केल्याचे ऑक्शन रिपोर्टवरून दिसून येत आहे.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.