बोर्डी, ता. ९ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यात केवायसी न झालेल्या हजारो शेतकऱ्यांची संख्या चिंताजनक आहे. त्यांच्या खात्यात भरपाईचे पैसे जमा होणार नसल्यामुळे सरकारी मदतीपासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीसाठी असलेली केवायसी करण्याची अट रद्द करावी, अशी मागणी आमदार विनोद निकोले यांनी केली आहे.
२०२४ आणि २०२५ या खरीप हंगामात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि वादळ वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाने आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र ही मदत मिळण्याची प्रक्रिया अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे हजारो शेतकरी वर्षभरापासून मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे केवायसीची अट रद्द न झाल्यास, ग्रामीण भागात महसूल विभागाच्या देखरेखीखाली सेतू केंद्रचालकांनी गोरगरीब शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी मदत करावी, अशी विनंतीही निकोले यांनी केली आहे.
आमदार निकोले यांनी डहाणू आणि तलासरीतील मदतीच्या प्रक्रियेचा नुकताच आढावा घेतला. डहाणूमध्ये १२,४६८ पैकी ७,२४१ शेतकऱ्यांचे केवायसी झालेले नाही. केवळ चार हजार ८९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. तलासरीमध्ये सहा हजार ६६८ पात्र शेतकऱ्यांपैकी १,९४१ जणांचे केवायसी झालेले नाही. दोन हजार ८१६ बाधितांना मदत मिळाली. भरपाई मिळण्यास होत असलेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांसमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली असून ते मदतीपासून वंचित राहण्याची भीती विनोद निकोले यांनी व्यक्त केली आहे.
कमी भरपाईचा आरोप
शेतकऱ्याला किमान दोन हेक्टर जमिनीवर भरपाई देणे क्रमप्राप्त आहे; परंतु कृषी विभागाकडून २२,५०० रुपयांप्रमाणे दोन हेक्टरसाठी ४५ हजारांचे वाटप करायचे आहेत. दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या अनेक शेतकऱ्यांना कमी भरपाई देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे, याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे विनोद निकोले यांनी सांगितले. याविषयी संबंधित खात्याच्या मंत्र्यांना भेटून लवकरच खुलासा करण्याचा आग्रह धरणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
२०२४ व २०२५ या खरीप हंगामाच्या काळातील भरपाईसंदर्भात ही केवायसीची अट लवकरच शिथिल करण्यात येईल. तसेच पुराव्यांवर शेतकऱ्यांच्या खात्यात मदत व पुनर्वसन खात्याकडून मिळणारी आर्थिक मदत लवकरात लवकर दिली जाईल, अशा प्रकारची प्रक्रिया सरकारच्या पातळीवर सुरू आहे. बाधितांनी थोडासा धीर धरावा.
- अमोल पाठक, तहसीलदार, तलासरी
तलासरी डहाणू
केवायसी अपूर्ण १,९४१ ७,२४१
मदत रखडली १०० २९२
अनुदान मिळाले २,८१६ ४,८९५
मदत प्रक्रिया सुरू १,८०७ ४०