अपघाताला ‘रेल्वे’च जबाबदार
जखमी चोघले कुटुंबीयांचा संताप
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः सॅंडहर्स्ट रोड स्थानकातील रेल्वे अपघातात जखमी झालेल्या कैफ आणि हाफिजा चोघले यांच्यावर भायखळा येथील बालाजी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर त्यांना तत्काळ जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र ६० वर्षीय हाफिजा चोघले यांची प्रकृती बिघडल्याने नातेवाइकांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या अपघाताला रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप चोघले कुटुंबीयांनी केला आहे.
मुंब्रा येथे राहणारे कैफ आणि हाफिजा चोघले हे सँडहर्स्ट येथील आपल्या सख्ख्या भावाला भेटण्यासाठी गुरुवारी (ता. ६) निघाल्या होत्या. रेल्वे कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा फटका रेल्वेच्या वेळापत्रकाला बसला. तासभराहून अधिक काळ रेल्वे ट्रॅकवर थांबलेल्या रेल्वेतून ट्रॅकवरून चालत जाण्याचा निर्णय अनेक प्रवाशांनी घेतला. हाफिजा यांचा मुलगा सैफ यांनी ‘सकाळ’ला सांगितले, की ‘रेल्वे ट्रॅकवर एक तास एकच गाडी उभी होती. शेवटी नाईलाजाने माझी आई आणि भाऊ कैफ रेल्वे ट्रॅकवर उतरले; पण समोरून येणाऱ्या जलद लोकलचा धक्का आईच्या डोक्याला लागला. तर या धक्क्यात भावाचा खांदा निखळला आहे. सध्या माझ्या आईवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून भावाची प्रकृती स्थिर आहे.’
कैफ आणि सैफ यांच्या मावशीच्या मुलीचे निधन झाल्याने सांत्वनासाठी चोघले कुटुंब जात असताना ही दुर्घटना घडली. या अपघातात रेल्वे प्रशासनाचीच चूक होती. या चुकीचा नाहक त्रास अपघातग्रस्त कुटुंबीयांना झाल्याचे सांगत चोघले यांच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. ही घटना घडल्यावर सायंकाळी सव्वासातच्या सुमारास मुंब्र्यात राहणाऱ्या हाफिजा चोघले यांचा दुसरा मुलगा सैफ याला ही बातमी फोनवरून समजली.
लोकलच्या धक्क्याने दोघेही नाल्यात पडले
प्रवाशांच्या माहितीनुसार, लोकल खूप वेळ एकाच जागी थांबून होती. सगळे प्रवासी उतरल्याचे पाहून शिवाय, समोरच दिसणारे सँडहर्स्ट रोड स्थानकात चालत जाऊ, या उद्देशाने कैफने आई हाफिजा यांना कसेबसे रेल्वे ट्रॅकवर उतरवले; मात्र त्याच वेळी वळणावर असताना मागून लोकल आली. यामध्ये आईला वाचवायला कैफने आईला खेचले; मात्र लोकलचा धक्का लागल्याने दोघेही नाल्यात पडल्याचे सैफने सांगितले. हा अपघात रेल्वे प्रशासनाचे अपयश असल्याचे सैफने सांगितले. दरम्यान, या अपघातात हाफिजा यांच्या मेंदूत अंतर्गत रक्तस्राव होत असल्याचे त्यांचे पती शबीर चोघले यांनी सांगितले.
जखमींना उचलण्यात अडचणी!
लोकलच्या धक्क्यात नाल्यात पडून जखमी होऊन ही अपघातस्थळी स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने जखमींना उचलण्यात अडचण निर्माण झाली. त्यामुळे सरकारी यंत्रणेकडून कोणतीही तत्काळ मदत मिळाली नाही, असा आरोप चोघले यांच्या नातेवाइकांनी केला. रेल्वे प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.