१०३ वर्षांनी किरमिजी आणि कोकण छायासुंदरींचे दर्शन
राजीव डाके ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे शहर, ता. ८ ः भारताचा हरित मेरुदंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम घाटाने पुन्हा विज्ञानजगताचे लक्ष वेधून घेतले आहे. या भागात तब्बल १०३ वर्षांनंतर दोन नवीन टाचण्यांच्या प्रजातींचा शोध लागला आहे. कोकण छायासुंदरी आणि किरमिजी छायासुंदरी अशी त्यांची नावे आहेत. त्यांचा शोध लावण्याची कामगिरी महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकातील संशोधकांनी केली आहे. त्यामध्ये ठाण्यातील एका तरुणाचा समावेश आहे.
किरमिजी आणि कोकण छायासुंदरी या दोन्ही टाचण्या प्रोटोस्टिक्टा या वंशातील असून त्यांना छायासुंदरी आणि किरमिजी हे नाव अगदी योग्य ठरले आहे, कारण या टाचण्या दाट जंगलातील थंड, ओलसर, सावलीदार झऱ्यांच्या काठावरच दिसतात. या शोधामुळे भारताने जागतिक जैवविविधतेच्या नकाशावर पुन्हा एक ठळक ठसा उमटवला आहे, असे म्हणता येईल. केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील संशोधकांनी संयुक्त प्रयत्नातून या दोन टाचण्यांचा शोध घेतला असून संशोधन अहवाल आंतरराष्ट्रीय कीटकशास्त्र पत्रिका झूटॅक्सामध्ये प्रसिद्ध झाला आहे. या दोन्ही प्रजातींना जागतिक मान्यता प्राप्त झाली आहे.
केरळमधील तिरुअनंतपुरम येथे किरमिजी छायासुंदरी आढळून आली असून तिच्या छातीवरील तांबूस-किरमिजी पट्ट्यांमुळे तिला ‘संग्विनीथोरॅक्स’ हे नाव देण्यात आले आहे. तर कोकण छायासुंदरी महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली-हिरण्यकेशी नदी परिसरात सापडली आहे. त्या भागातील निसर्ग, ओलसर हवामान आणि हिरवाईने नटलेला आहे. या संशोधनात भारतीय वैज्ञानिकांचा मोठा वाटा आहे. डॉ. विवेक चंद्रन (केरळ), डॉ. कृष्णमेघ कुंटे (एनसीबीएस, बंगळूर), डॉ. पंकज कोपर्डे (पुणे), डॉ. दत्तप्रसाद सावंत (ठाणे), फुलपाखरू अभ्यासक हेमंत ओगले (आंबोली) आणि निसर्गप्रेमी अभिषेक राणे (वानोशी) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे. संशोधनातून उघड झाले आहे, की ‘कोकण छायासुंदरी’ ही आधीच्या प्रजातींपेक्षा जनुकीयदृष्ट्या तब्बल ११ टक्के वेगळी, तर ‘किरमिजी छायासुंदरी’ १० टक्के वेगळी आहे.
अभ्यासासाठी जागतिक केंद्र
टाचण्या केवळ स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि थंड हवामानातच जिवंत राहतात. त्यामुळे ज्या भागात या दिसतात, तो परिसर पर्यावरणीयदृष्ट्या समृद्ध आणि संवेदनशील असल्याचे द्योतक आहे. डॉ. दत्तप्रसाद सावंत यांच्या मते या छोट्या टाचण्या डासांची अंडी आणि अळ्या खातात. त्यामुळे त्या नैसर्गिक डास-नियंत्रक आहेत. पश्चिम घाट हा जगातील हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटीपैकी एक असून, आंबोली, दोडामार्ग, भीमाशंकर, कोयना, वायनाड आणि अगुंबे हे परिसर कीटकशास्त्र अभ्यासासाठी जागतिक केंद्र मानले जातात. या नव्या शोधाने त्या जैवसंपत्तीला नवा मुकुट मिळाला आहे.
१०३ वर्षांनंतर या दोन टाचण्यांचा शोध लागणे हा भारतासाठी अभिमानास्पद टप्पा ठरला आहे, त्यांच्या अस्तित्वाने निसर्ग अजूनही जिवंत आहे, निर्मळ आहे हे दिसते. आपण त्याला फक्त ओळखण्याची आणि जपण्याची दृष्टी ठेवली पाहिजे.
- डॉ. दत्तप्रसाद सावंत, पर्यावरण अभ्यासक, ठाणे
कोट फोटो : डॉ. दत्तप्रसाद सावंत
गवताच्या पानावर बसलेली किरमिजी छायासुंदरी
...........................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.