बदलापूर शहरात मविआ बॅकफूटवर
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, तरीही उमेदवारांची घोषणा नाही
बदलापूर, ता. ८ (बातमीदार) ः दहा वर्षांपासून रखडलेल्या कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. निवडणुकीची औपचारिक घंटा वाजताच शहरातील राजकीय वातावरण तापले असून, भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे; मात्र महाविकास आघाडी अद्यापही गोंधळात दिसत आहे. कार्यक्रम जाहीर होऊनही महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाने उमेदवारांची घोषणा केलेली नाही. उलट, बैठका आणि नियोजनाच्या हालचालींचादेखील मागमूस दिसत नसल्याने महाविकास आघाडीचा निभाव शहरात लागेल का, असा प्रश्न बदलापूरकरांना पडू लागला आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या फुटीचा परिणाम बदलापूरसारख्या नगरपालिका क्षेत्रातही ठळकपणे जाणवत आहे.
शहरातील अनेक दिग्गज नेत्यांनी सत्ताधारी पक्षांची सूत्रे हाती घेतल्याने महाविकास आघाडीच्या उरलेल्या कार्यकर्त्यांचे मनोबल खचले आहे. ठाकरे गटातील निष्ठावंत पदाधिकारी आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे काही कार्यकर्ते शहरात सक्रिय असले, तरी त्यांचे आर्थिक सामर्थ्य आणि कार्यकर्त्यांचे प्रमाण भाजप, शिंदे सेना किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तुलनेत खूपच कमी आहे. एकंदरीत, बदलापूरच्या राजकारणात सत्ताधारी पक्षांचा जोश वाढत असताना, महाविकास आघाडी मात्र पूर्णपणे बॅकफूटवर गेल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष
तीन वर्षांत महाविकास आघाडीने विरोधी पक्ष म्हणून शहरातील प्रश्नांवर ठोस भूमिका घेतलेली नाही. पाणी, वीज, रस्ते, वाहतूक कोंडी, पार्किंग आणि रेल्वे स्थानकातील मूलभूत समस्या, तसेच महिलांसाठी सार्वजनिक शौचालयांची समस्या अजूनही तीव्र आहेत. तरीही महाविकास आघाडीकडून या प्रश्नांवर ठोस आंदोलन किंवा जनसंपर्क झालेला नाही.
भाजप- शिंदे- राष्ट्रवादी आघाडी सज्ज
निवडणुका जाहीर होताच शहरातील भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयांत बैठका, नियोजन आणि प्रचाराचे सत्र सुरू झाले आहे. याउलट मविआच्या कार्यालयांमध्ये शुकशुकाट आहे. १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून केवळ चार दिवस बाकी असतानाही महाविकास आघाडीने एकाही उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही.
खासदारही निष्क्रिय
महाविकास आघाडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनीदेखील बदलापूर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अद्याप कोणतीही बैठक किंवा चर्चा सुरू केलेली नाही. त्यामुळे ही निवडणूक महाविकास आघाडीसाठी खरोखरच महत्त्वाची आहे का, की त्यांनी आधीच माघार घेतली आहे, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.