सरकारी धान्याचा काळाबाजार
ट्रकचालकास अटक
शहापूर, ता. ८ (वार्ताहर): भिवंडी तालुक्यातील सरकारी धान्य गोदामातून शहापूर तालुक्यातील अघई गावातील स्वस्त धान्य दुकानाच्या पुरवठ्यासाठी निघालेला गहू आणि तांदूळ भरलेला ट्रक नेमून दिलेल्या मार्गाने न जाता, शहापूर शहरालगत एका खासगी राईसमिलजवळ घुटमळत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे सरकारी धान्याने भरलेला हा ट्रक शहापूर पोलिसांनी जप्त केला असून, शुक्रवारी (ता. ७) रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जप्त केलेल्या ट्रकमध्ये प्रत्येकी ५० किलो वजनाच्या तांदळाच्या ३२० गोण्या (सुमारे १६० क्विंटल तांदूळ) आणि सोबत ५ क्विंटल गहू होता. भिवंडीतील सरकारी गोदामातून हा माल अघई गावातील स्वस्तदर धान्य दुकानाच्या पुरवठ्यासाठी निघाला होता. ट्रक नेमून दिलेल्या मार्गावर न जाता, शहापूर शहरालगत वाफे गावाकडे जाणाऱ्या गंगारोड भागातील अर्चना इंग्लिश माध्यमाच्या शाळेसमोर असलेल्या खाजगी राईसमिल समोर दुपारच्या सुमारास आढळून आला. ट्रक चालकाने वाहनातील सार्वजनिक वितरणाच्या धान्याचा काळाबाजार करण्याच्या उद्देशाने नेमून दिलेल्या मार्गात बदल करून, धान्याचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले.
तालुका पुरवठा अधिकारी यांनी फिर्याद नोंदविल्यानंतर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६०/२०२५, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील तरतुदीनुसार कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एजाज शहा या ट्रकचालकास अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. शहापूर तालुक्यात सरकारी धान्याचा काळाबाजार करण्याच्या घटना गेल्या काही वर्षांपासून सातत्याने उघडकीस येत आहेत. यामुळे या काळाबाजाराची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.