पालघर, ता. ८ ः मोखाडा तालुक्यात व्यसनी बापाला १६ वर्षांच्या मुलाने डोक्यात मुसळ घालून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोखाडा पोलिस ठाणे हद्दीमधील कुरलोद पैकी शेरीचा पाडा येथे गुरुवारी (ता. ६) सकाळी कौटुंबिक वाद आणि मारहाणीतून हा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.
शेरीचा पाडा येथे भगवान नवसू बर्तन (वय ४५) हे कुटुंबीय राहत हाेते. गुरुवारी दहा वाजताच्या सुमारास भगवान हे दारू पिऊन घरात आले. त्यानंतर त्यांनी पत्नी सुनंदाशी भांडण सुरू केले. याच्या वादातून त्यांनी सुनंदा आणि त्यांच्या भावंडांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यांचा अल्पवयीन मुलगा हा भांडण सोडवण्यासाठी गेला होता. त्या वेळी भगवान यांनी त्याचा गळा आवळला.
वडील दारू पिऊन सातत्याने घरात भांडण आणि आईसह भावंडाना मारहाण करतात, हा राग मनात ठेवून या मुलाने घरात असलेल्या लाकडी मुसळीने भगवान यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जोरदार प्रहार केले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिस पाटील भिवा मेंगाळ यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अल्पवयीन मुलावर खुनाच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला भिवंडी येथील बालसुधारगृहात पाठवले आहे, असे मोखाडा पोलिस सहाय्यक निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांनी म्हटले आहे.