अंबरनाथ, ता. ८ (वार्ताहर) : अंबरनाथ, बदलापूर, वांगणी परिसरातील हजारो चाकरमानी रोज मुंबईकडे प्रवास करतात; मात्र वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत लोकलसेवा वाढली नसल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ‘बदलापूर युथ रेजिमेंट’ या संघटनेने खासदार सुरेश म्हात्रे यांना निवेदन देऊन अंबरनाथ लोकल बदलापूरपर्यंत वाढवावी आणि पीक अवर्समध्ये लोकलची सेवा वाढवावी, अशी मागणी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेने धावणाऱ्या लोकल गाड्या कमी प्रमाणात आहेत. त्या वारंवार उशिराने धावत आहेत. एक्स्प्रेस, मेल आणि मालगाड्यांना प्राधान्य दिल्याने उपनगरी लोकल्स अनेकदा मधेच थांबवाव्या लागतात. त्यामुळे सकाळी कार्यालयीन वेळी आणि संध्याकाळी घरी परतताना प्रवाशांचे वेळापत्रक विस्कळित होते, तर गर्दीमुळे प्रवासही धोकादायक बनला आहे. संघटनेने सांगितले, उपनगरी गाड्या वेळेत न धावल्याने विद्यार्थी, नोकरदार, महिला प्रवासी सर्वच त्रस्त आहेत. गर्दीमुळे अपघातांच्याही घटना वाढल्या आहेत. त्यामुळे लोकलसेवा वाढवून वेळापत्रकाचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सेवा लवकर सुरू न झाल्यास रेल्वे प्रवासी संघटना आणि बदलापूर युथ रेजिमेंट मिळून जनआंदोलन उभारतील, असा त्यांनी स्पष्ट इशारा दिला. याप्रसंगी ॲड. धीरज बनसोडे, उपाध्यक्ष आशिष जाधव, तसेच रोहित लोंढे, राहुल गायकवाड, ऍड. सुमित नरवडे, राहुल साळवे, संघर्ष कदम आदी सदस्य उपस्थित होते.
प्रयत्न करण्याचे आश्वासन
खासदार म्हात्रे यांनी निवेदन स्वीकारत, प्रवाशांच्या समस्येकडे गांभीर्याने पाहून रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.