चवदार तळ्याची दयनीय अवस्था
संभाजी ब्रिगेडचा प्रशासनाला इशारा
माणगाव, ता. ८ (वार्ताहर) : समतेच्या क्रांतीचे प्रतीक ठरलेले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक सत्याग्रहाने पावन झालेले महाड येथील चवदार तळे सद्यस्थितीत अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. तळ्यात साचलेला कचरा, शैवाल आणि दुर्गंधीमुळे या ऐतिहासिक स्थळाची पवित्रता मलिन झाली असून भीम अनुयायांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड रायगड तर्फे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन देऊन त्वरित कारवाईची मागणी करण्यात आली.
या प्रतिनिधी मंडळाने महाड नगरपरिषद, प्रांताधिकारी, तहसीलदार आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक (महाड शहर) यांना निवेदन देऊन तळ्याच्या स्वच्छतेची मागणी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष वैभव हरिश्चंद्र सुर्वे यांनी सांगितले की, महाड हे केवळ एक ठिकाण नाही, तर भारताच्या सामाजिक समतेच्या संघर्षाचे पवित्र रणांगण आहे. २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथे केलेला ‘चवदार तळे सत्याग्रह’ हा मानवाच्या मूलभूत अधिकारांसाठीचा जगातील पहिला संघर्ष होता. दरवर्षी हजारो इतिहासप्रेमी, भीम अनुयायी आणि पर्यटक या तळ्याला भेट देतात. मात्र सध्या तळ्याचे पाणी शैवालांनी व्यापले असून, त्यातून दुर्गंधी सुटत आहे. या दुर्दशेचे स्वरूप म्हणजे प्रशासनाचे दुर्लक्ष आणि महामानवांच्या कार्याचा अपमानच असल्याचे संभाजी ब्रिगेडने नमूद केले. संविधान निर्माते डॉ. आंबेडकरांनी या तळ्याच्या पाण्याला समतेचे प्रतीक मानले होते. त्यामुळे हे ठिकाण ‘क्रांतीभूमी’ म्हणून ओळखले जाते. अशा पवित्र स्थळाकडे दुर्लक्ष होणे ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे ब्रिगेडच्या निवेदनात म्हटले आहे. तसेच चवदार तळ्याची तत्काळ स्वच्छता करून पाणी पिण्यायोग्य करावे, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
अन्यथा संभाजी ब्रिगेड आमरण उपोषणासह तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबेल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. जर प्रशासनाने या निवेदनाकडे दुर्लक्ष केले, तर आम्ही रस्त्यावर उतरून लढा उभारू आणि यासाठी पूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असा सूचक इशाराही देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.