टँकरमुक्तीचे स्वप्न दुभंगले
पनवेल पालिकेची पुरवठ्यासाठी १० कोटींची निविदा
वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. ८ ः पालिका हद्दीत सव्वादोनशेच्या आसपास टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अशातच पनवेल पालिकेने तीन वर्षांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी १० कोटींची निविदा काढली आहे. त्यामुळे ‘टँकरमुक्ती पनवेल’ची संकल्पना कागदावरच असल्याचे अधोरेखित झाले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्र ११० किलोमीटर आहे. या ठिकाणची लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेतून सिडको तसेच खासगी भूखंडावर मोठ्या संख्येने इमारती बांधण्यात येत आहेत. त्यामुळे घरांची संख्या दिवसागणिक वाढत आहे; मात्र त्या प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याने टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. पनवेल शहर वगळता सिडको कॉलनीमध्ये प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण एमआयडीसी आणि नवी मुंबई महापालिकेकडून पाणी येथे दिले जाते; मात्र मागणीच्या तुलनेत संबंधित यंत्रणांकडून पाणी कमी मिळत असल्याने पाणीटंचाई अत्यंत गंभीर स्वरूपाची झाली आहे.
-------------------------------
कोट्यवधींचा खर्च
खारघर येथे हेटवणे धरणातून पाणी दिले जात असले तरी पुरवठासुद्धा कमी पडत आहे. त्याचबरोबर देहरंग धरणामधून पनवेलची तहान भागत नसल्याने एमजेपीवर अवलंबून राहावे लागते. शहराला दिवसाआड पाणी दिले जाते. न्हावा शेवा पाणीपुरवठासारख्या योजना प्रगतिपथावर असली तरी पनवेल महापालिका हद्दीत तीन वर्षांकरिता दहा कोटींहून अधिकची निविदा प्रसिद्ध केली आहे. तर सिडकोने एक कोटींपेक्षा जास्त खर्च केला आहे.
--------------------------------
टंचाईची कारणे
- चौक येथील मोरबे धरणासाठी सिडकोने १०० कोटींपेक्षा जास्त खर्च केला; मात्र लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव हे धरण नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले. या धरणातील ९० एमएलडी पाणी सिडको वसाहतींसाठी आरक्षित असल्याचा प्राधिकरणाचा दावा आहे; पण नवी मुंबई महापालिकेकडून मागणीप्रमाणे पाणी दिले जात नसल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
- न्हावा शेवा टप्पा ३ या योजनेचे काम ५ वर्षांपासून सुरू आहे. २०२० मध्ये सुरू झालेले काम २०२३ मध्ये पूर्ण होईल, असा आशा होती; परंतु ४०८ कोटींचा हा प्रकल्प आता ४९८ कोटींवर गेला आहे. कामाची कालमर्यादा उलटून दोन वर्षे लोटल्यानंतरही प्रकल्प अपूर्णच असून, आणखी काही वर्षांचा कालावधी लागणार असल्याने पाणीटंचाई कायम राहणार आहे.
--------------------------
पनवेल महापालिका, सिडकोने काही वर्षांपूर्वी टँकरमुक्त पनवेल हा संकल्प जाहीर केला होता; मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीपुरवठ्याचा ताण लक्षात घेता दोन्ही संस्थांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे, ही केवळ घोषणा ठरली आहे.
- अमोल शितोळे, शहराध्यक्ष, शेकाप
---------------------------
पनवेल परिसरातील नागरिकांना आजही पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. महापालिका, सिडको दोन्ही संस्थांनी टँकरमुक्त पनवेलचे स्वप्न दाखवले; पण वास्तव काही वेगळेच आहे. या प्रश्नावर जनतेसह रस्त्यावर उतरून आंदोलनाशिवाय पर्याय नाही.
- बाळाराम पाटील, माजी आमदार, शेकाप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.