गव्हाणफाट्यावरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम रखडले
वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी; उपाययोजना करण्याची मागणी
उरण, ता. ८ (वार्ताहर) ः नवी मुंबई आणि प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या गव्हाणफाट्यावरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या पुलाच्या कामातील संथ गती आणि रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दररोज वाहतूक कोंडी होत असून, प्रवासी आणि वाहनचालकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
हा पूल पनवेल आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्या चिरनेर, दिघोडे, चाभूळपाडा, वेश्वी, विंधणे आणि कळंबूसरे परिसरातील विद्यार्थी, चाकरमानी आणि प्रवाशांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र रेल्वेच्या विस्तारीकरणामुळे २०२३ मध्ये जुना पूल तोडण्यात आला आणि टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीकडे नवीन पुलाचे काम सोपवण्यात आले. परंतु दोन वर्षांनंतरही काम अत्यंत मंद गतीने सुरू असून, नागरिकांना चार ते पाच किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. या विलंबामुळे वाहनांची रांग लागते. धूळ आणि प्रदूषण वाढले आहे. तसेच अनेक वेळा अपघाताची शक्यता निर्माण होते. स्थानिक नागरिक आणि रिक्षाचालकांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. इको रिक्षाचालक दिनेश म्हात्रे यांनी सांगितले, की गव्हाणफाट्यावरील मार्ग बंद असल्याने आम्हाला रोजचा प्रवास चार ते पाच किलोमीटरने वाढला आहे. इंधन खर्च वाढतो, प्रवासी कमी होतात आणि शाळेच्या मुलांनाही दोन वाहने बदलावी लागतात. ही परिस्थिती असह्य झाली आहे.
................
रेल्वे प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांच्या समन्वयाअभावी कामात विलंब होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. उड्डाणपुलाचे काम पूर्ण न झाल्यास येत्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वाढत्या वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.