भिवंडी, ता. ८ (वार्ताहर) : वंदे मातरम् हे गीत काल, आज आणि उद्याही समाजासाठी प्रेरणादायी राहील, असे गौरवोद्गार भारत विकास अभियानाचे निमंत्रक ॲड. प्रबोध जयवंत यांनी काढले. ते भादवड येथील संत कबीर औद्योगिक महाविद्यालयाच्या वतीने सामूहिक वंदे मातरम् गीत गायन कार्यक्रमात बोलत होते.
वंदे मातरम् गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर कार्यक्रम घेण्यात आला होता. त्याचे अध्यक्षस्थान तहसीलदार अभिजित खोले यांनी भूषवले. या वेळी माजी आमदार रूपेश म्हात्रे, स्वामी स्वरूपानंद, माजी शिक्षण समिती सभापती सुंदर नाईक, नायब तहसीलदार आदेश म्हात्रे, पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी संजय अस्वले, भिवंडी महापालिका समाजकल्याण विभागप्रमुख मिलिंद पळसूले, शालेय प्रशासन अधिकारी सौदागर शिखरे, गजेंद्र गुळवी उपस्थित होते. वंदे मातरम् या गीतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचा भारत प्रतिबिंबित झाला आहे. १९०५ च्या वंगभंग आंदोलनात ‘वंदे मातरम्’ हा घोष भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा ठरला. आजही देश अखंड ठेवण्यासाठी आणि देशभक्तीची प्रेरणा देण्यासाठी हे गीत तेवढेच महत्त्वाचे आहे. त्या काळीही ब्रिटिशांना या शब्दाची भीती होती आणि आजही तो शब्द आपल्या देशाला एकत्र बांधतो, असे ॲड. जयवंत पुढे म्हणाले. कार्यक्रमात भादवड आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरम् विषयावर पथनाट्य सादर केले. याप्रसंगी महदीप सिंग, चंद्रकांत म्हात्रे, विश्वनाथ म्हात्रे, विनोद पाटील, सुनील पाटील, महेंद्र सोनवणे, कुसुम वारघडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ पाटील यांनी केले.
भिवंडी पालिकेत सामूहिक गायन
भिवंडी, ता. ८ (वार्ताहर) : ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५०व्या वर्धापन दिनानिमित्त भिवंडी महापालिका मुख्यालयात गुरुवारी सामूहिक गायनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या आदेशानुसार, तसेच पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अनमोल सागर यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबविला.
पालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावर झालेल्या कार्यक्रमात उपायुक्त विक्रम दराडे यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. याप्रसंगी ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाद्वारे देशभक्तीचा आणि एकतेचा संदेश देण्यात आला. याच पार्श्वभूमीवर भिवंडीतील सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये, तसेच शाळांमध्येही सामूहिक गायन झाले. कार्यक्रमाला उपायुक्त (कर) बाळकृष्ण क्षीरसागर, शहर अभियंता जमील पटेल, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संदीप गाडेकर, सहाय्यक आयुक्त (निवडणूक) अजित महाडिक, अतिरिक्त शहर अभियंता सचिन नाईक यांसह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समारोप करताना उपस्थितांनी ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला.
बी.एन.एन. महाविद्यालयात राष्ट्रगीताचे स्मरणोत्सव
भिवंडी, ता. ७ (वार्ताहर) : ‘वंदे मातरम्’ गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बी. एन. एन. वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयात गुरुवारी सामूहिक गायन झाले. राष्ट्रगीताच्या सुरेल निनादाने संपूर्ण महाविद्यालय परिसर दुमदुमून गेला. याप्रसंगी विद्यार्थ्यांपासून प्राध्यापकांपर्यंत सर्वांनी एकात्मतेचा आणि देशभक्तीचा संदेश देत उत्साहाने सहभाग नोंदविला. ‘वंदे मातरम्’च्या रचनेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, सरकारच्या आदेशानुसार हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. शशिकांत म्हाळुंकर, उपप्राचार्य डॉ. सुधीर निकम, डॉ. सुरेश बदरगे, डॉ. निनाद जाधव, डॉ. कुलदीप राठोड, रजिस्ट्रार नरेश शिरसाळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य मनोहर महाले, पर्यवेक्षक श्रीकांत पाटील, तसेच प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने घेण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अखेरीस देशभक्तीपर घोषणांनी वातावरण भारावून गेले.
भिवंडी : बी. एन. एन. महाविद्यालयात राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले.