पश्चिम रेल्वेवर फुकटे प्रवासी वाढले
सात महिन्यांत १२१.६७ कोटी दंड वसूल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : पश्चिम रेल्वेवरील प्रवासीसंख्या वाढत आहे. वातानुकूलित गाड्यांसह सामान्य रेल्वे गाड्यांमध्येही प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. याच गर्दीचा फायदा घेत बहुतांश प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रवाशांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील विशेष तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विनातिकीट प्रवाशांकडून तब्बल १२१ कोटी ६७ लाख रुपये दंड वसूल केला आहे. या सात महिन्यांच्या काळात झालेली ही वसुली गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल ५१ टक्क्यांनी अधिक आहे. एवढेच नव्हे, तर रेल्वे बोर्डाने निश्चित केलेल्या लक्ष्यापेक्षा १४ टक्के जास्त वसुली झाली आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यातच विनातिकीट व अनियमित प्रवास तसेच अनधिकृत सामानाशी संबंधित ३.३९ लाख प्रकरणांवर कारवाई करीत २४.२० कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही वसुली मागील वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत दुप्पट आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वडोदरा, रतलाम, राजकोट, भावनगर आणि अहमदाबाद या विभागांतील पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी करण्यात आली.
या तिकीट तपासणी पथकाने विनातिकीट प्रवाशांना पकडून गेल्या वर्षीपेक्षा जास्त दंडवसुली करण्यात यश मिळविले. एप्रिल ऑक्टोबर या कालावधीत १८.९० लाख विनातिकीट प्रवाशांना पकडून १२१.६७ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. गेल्यावर्षी एप्रिल-ऑक्टोबर या कालावधीत दंडवसुलीच्या तुलनेत तो ५१ टक्क्यांनी जास्त आहे.
एसी लोकलमध्येही फुकटे
सामान्य रेल्वे गाड्यांसह एसी गाड्यांमध्येही विनातिकीट प्रवासीसंख्या वाढली आहे. ही बाब लक्षात घेत पश्चिम रेल्वेकडून एसी लोकल गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी वारंवार तिकीट तपासणी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचा परिणाम म्हणून एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान ६२ हजारांहून अधिक प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून २.०२ कोटी रुपये वसूल करण्यात आले. ही रक्कम मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ७६ टक्के अधिक आहे. पश्चिम रेल्वेने प्रवाशांना प्रवास करताना नेहमी वैध तिकीट घ्या आणि नियमांचे पालन करून सहप्रवाशांचा प्रवास सुखकर बनवा, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.