गावठी पिस्टल, काडतुसांसह एकाला अटक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने गावठी बनावटीची पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्यास मुंब्रा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३१ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
मुंब्र्यातील एम. एम. व्हॅली येथे एका खासगी वाहनाच्या आडोशाला थांबून ७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बेकायदेशीररीत्या आपल्या ताब्यात अग्निशस्त्र बाळगत, काहीतरी दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने एक जण येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजस सावंत यांना मिळाली होती. त्यानुसार मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलिसांनी सापळा रचून मुंब्रा, अमिनाबाग येथील जहीर अली मंचेकर (४७) याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्या अंगझडतीत ३० हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक हजारांची दोन जिवंत काडतुसे असा ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात भारतीय हत्या कायदा व १९५९ चे कलम ३,२५ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे ३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.