ठाण्यात फुटबॉल प्रतिभेचा आविष्कार
निवड चाचणीला उत्फूर्त प्रतिसाद; ‘लिओनेल मेस्सी’सोबत खेळण्याची संधी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : क्रिकेटचा ज्वर चढलेला असताना फुटबॉलचे वेडही खेळाडूंमध्ये कायम आहे, मात्र हा खेळ केवळ हौसेपुरता मर्यादित न राहता जागतिक दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत, यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘प्रोजेक्ट महादेवा’ सुरू केले आहे. त्याअंतर्गत ठाणे जिल्ह्यात झालेल्या निवड चाचणीला युवा खेळाडूंचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल ४१९ खेळाडू या चाचणीला सामोरे गेले होते. त्यापैकी मुला-मुलींची प्रत्येकी २० जणांची पहिल्या फेरीसाठी निवड झाली असून, राज्याच्या टीममध्ये समावेश झाल्यास त्यांना जागतिक दर्जाचे फुटबॉलपटू ‘लिओनेल मेस्सी’ यांच्यासोबत खेळण्याची संधी मिळणार आहे.
राज्य क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र), सिडको आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात फुटबॉल खेळाचा विकास करण्यासाठी ‘प्रोजेक्ट महादेवा’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील युवा खेळाडूंना फुटबॉलमध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेचा एक भाग म्हणून, राज्यातील १३ वर्षांखालील मुले व मुलींसाठी जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर फुटबॉल निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंची निवड चाचणी १ आणि २ नोव्हेंबर रोजी झाली.
नवी मुंबई नेरूळ येथे ही चाचणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे आणि ठाणे फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. दोन दिवस चाललेल्या या निवड चाचण्यांमध्ये ठाणे जिल्ह्यातील तरुण फुटबॉलपटूंनी दाखविलेला सहभाग, शिस्त आणि उत्साह पाहायला मिळाला. निवड प्रक्रियेत पहिल्या दिवशी ३५५ मुले आणि दुसऱ्या दिवशी ६४ मुली अशा एकूण ४१९ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. निवड प्रक्रियेनंतर २० मुले व २० मुलींची ठाणे जिल्ह्याच्या वतीने पुढील विभागीय फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. अशी माहिती ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी दिली आहे.
खेळाडूंची यादी
अंडर - १३ मुले ः आर्यव्रत सरस्वत, निहार नांबियार, आर्य नायडू, दैविक गलानी, रणवीर सिंह चावला, आरव सोनवणे, मल्हार सावंत, अनय भुसकुटे, तनिष मल्लि, आर्यन पिंगळे, लक्ष्य मळकर, गिरीश मेनन, एप्रॉन डिसा, कनिष्क मिश्रा, निहार कृष्ण एस, तनय रंजीत, शीहान बॅनर्जी, विहान बांदी, स्वरित सातपुते व हर्षित निकम.
अंडर - १३ मुली ः स्वयमप्रभा महाराणा, जीविका राजपूत, निहारिका सुरेश, हना खान, स्वर कुदळे, नव्या पाटील, जीविका रुपेजा, कृतिका राय, दुर्वा तर्मळे, रेबेका सिबी, समायरा सिग, कियाराह सराफ, मन्नत आहुजा, अक्षरा शेट्टी, आश्मी शेट्टी, आरझू कदम, लावण्य ठाकरे, अनु रूपेश, त्रयी शेट्टी व फाटक इराम शमशुद्दीन.