जंजिरा किल्ल्यावर दृष्टिबाधित विद्यार्थ्यांची सफर
स्पर्शज्ञानातून घेतला दुर्गदर्शनाचा आनंद
मुरूड, ता. ११ (बातमीदार) ः जिजाऊ प्रतिष्ठान आणि नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दुर्गदर्शन मोहिमेच्या १४व्या पर्वात यंदा दृष्टिबाधित विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याची सफर केली. ८ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या विशेष मोहिमेत नॅबचे २९ विद्यार्थी व चार शिक्षिका सहभागी झाल्या होत्या. जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक चंद्रकांत साटम यांच्या नेतृत्वाखालील २९ स्वयंसेवकांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वीरीत्या पार पडली.
दहिसरहून सकाळी प्रस्थान करून सर्व सहभागी सम्राट हॉटेल, एकदरा येथे जमले. चहा-नाश्त्यानंतर जंजिराकडे रवाना झालेल्या या चमूचे स्वागत केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संवर्धक बी. जी. येलीकर यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी प्रकाश घुगरे आणि सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना किल्ल्याविषयी माहिती दिली तसेच त्यांच्या सुरक्षिततेची दक्षताही घेतली. शिडाच्या हेलकावणाऱ्या बोटीतून किल्ल्यात प्रवेश करणे हे आव्हानात्मक असले तरी सर्वांनी ते उत्साहाने पार केले. किल्ल्याच्या महादरवाजावरील लोखंडी कडी, टोकदार खिळे, तसेच पंचधातूने मढवलेल्या प्रचंड तोफांचा स्पर्शज्ञानातून अनुभव घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद ओसंडून वाहत होता. प्रा. डॉ. मृण्मयी साटम यांनी ऐतिहासिक संदर्भांच्या माध्यमातून जंजिऱ्या अजिंक्यतेचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. दुर्गभ्रमंतीनंतर विद्यार्थ्यांनी किल्ल्याची तटबंदी स्पर्शून आणि स्वयंसेवकांच्या वर्णनातून न्याहाळली. परतीच्या प्रवासात समुद्राच्या गाजेसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने या विशेष सफरीचा समारोप झाला. दंडा-राजपुरी किनाऱ्यावर परतल्यानंतर सम्राट हॉटेल येथे सुग्रास भोजनाचा आस्वाद घेऊन विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व्यक्त केले. इतिहास प्रेरणादायी, प्रवास थोडा भीतीदायक पण अविस्मरणीय होता, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.