कोंडीने मुलांच्या शिक्षणावर परिणाम
स्कूल बसला रुग्णवाहिकेसारखे प्राधान्य देण्याची मागणी
कल्याण, ता. ११ (बातमीदार) : कल्याण पूर्वेकडील वालधुनी ब्रिज, पत्रीपूल आणि इतर प्रमुख चौकांवरील सततच्या वाहतूक कोंडीमुळे शाळकरी मुलांचे हाल होत असून, विद्यार्थ्यांना शाळेतून घरी परतण्यासाठी दररोज तासनतास मोजावे लागत आहेत. या परिस्थितीमुळे मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात आले असून, त्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता स्थानिक पालकांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना शिवसेनेकडून विशेष निवेदन देण्यात आले आहे.
रुग्णवाहिकांना तत्काळ रस्ता मोकळा करण्याच्या सवलतीप्रमाणेच शाळकरी मुलांच्या स्कूल बस आणि व्हॅननाही विशेष ओळखपत्र व सायरन सुविधा देण्यात यावी, जेणेकरून वाहतूक कोंडीतून त्यांना प्राधान्याने मार्ग दिला जाईल. हजारो लहान मुले रोज दोन ते तीन तास वाहतूक कोंडीत अडकून राहतात. ही परिस्थिती असह्य झाली आहे. शाळेच्या वाहनांना प्राधान्य सुविधा मिळाल्यास मुलांचे आयुष्य अधिक सोयीचे होईल आणि पालकांना मोठा दिलासा मिळेल, असे वाहतूक विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, पालकवर्गात या मागणीला अपेक्षित समर्थन मिळत असून, सरकार आणि पोलिस प्रशासनाने तत्काळ पावले उचलली नाहीत, तर लवकरच याविरोधात जनआंदोलन उभे राहील, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
दर्जेदार शाळेचा अट्टाहास, प्रवासाचा त्रास
शहरात शेकडो शाळा कार्यरत असताना, आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून अनेक पालक घराजवळील शाळा टाळून दूरवर असलेल्या नामांकित किंवा आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये मुलांना प्रवेश देतात, मात्र या शाळांपर्यंत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना स्कूल बस किंवा व्हॅनद्वारे प्रवास करावा लागतो. याच प्रवासात आता अनेक तास वाया जात असल्याने त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. या दीर्घ प्रवासामुळे मुलांचा थकवा वाढतो, अभ्यासासाठी वेळ कमी मिळतो आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत असल्याचे पालकांनी सांगितले.
तत्काळ उपाययोजनेची मागणी
शहरातील वालधुनी ब्रिज, काटेमानिवली, पत्रीपूल, कचोरे चौक, सहजानंद चौक व अन्य परिसरात दररोज सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने विद्यार्थ्यांच्या स्कूल बस तासनतास अडकून राहतात. नागरिकांनी प्रशासनाला तत्काळ उपाययोजना राबविण्याची मागणी केली असून, वाहतूक व्यवस्थापन सुधारले नाही, तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या मागणीसंदर्भात आम्ही वाहतूक पोलिस यंत्रणेला निवेदन दिले आहे. शिक्षणाच्या दृष्टीने हे पाऊल उचलणे सध्या गरजेचे बनले आहे. असे न झाल्यास मोठे जनआंदोलन उभारले जाईल.
- उदय रसाळ, माजी नगरसेवक
वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास विलंब होतो. त्यामुळे त्यांचे अभ्यासावरचे लक्ष विचलित होते. परीक्षांच्या वेळीही ते योग्य वेळेवर शाळेत पोहोचू शकत नाही. त्यामुळे ते तणावाखाली असतात. याचा परिणाम त्यांच्या गुणांवर दिसून येतो.
- मिलिंद धंबा, शिक्षक, गणेश विद्यामंदिर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.