पालिकेला आली जाग
बेकायदा वॉशिंग सेंटरवर पालिकेची धडक कारवाई
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १२ ः ठाकुर्लीतील रेल्वे समांतर रस्त्याकडेला फुटपाथवर बेकायदा वॉशिंग सेंटर सुरू करण्यात आले होते. याविषयी ‘दैनिक सकाळ’ने वृत्त प्रसारित करताच पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ‘ग’ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण पथकाने तत्काळ धडक कारवाई करत अनधिकृत पाण्याची जोडणी, टाकी काढून टाकत हे सेंटर बंद केले आहे.
कल्याण-डोंबिवली शहराला जोडणारा ठाकुर्ली रेल्वे समांतर रस्त्याकडेला असलेला फुटपाथ गिळंकृत करत काही माफियांनी येथे वॉशिंग सेंटर सुरू केले होते. दिवसाढवळ्या येथे गाड्या धुण्याचे काम सुरू असताना पालिका प्रशासनाच्या मात्र ही बाब निदर्शनास येत नव्हती. येथे बाजूलाच पालिका प्रशासनाचे सार्वजनिक शौचालय आहे. या शौचालयासाठी असलेल्या पाण्याचा वापर गाड्या धुण्यासाठी केला जात होता. दररोज हजारो लिटर पाणी गाड्या धुण्यासाठी वापरले जात होते. फुटपाथवर सेंटर सुरू करण्यास यांना परवानगी कोणी दिली, पाणी वापराचा करार आहे का, याबाबत सकाळने विचारणा केली असता कोणतेही स्पष्ट उत्तर मिळाले नव्हते. यावर कारवाई न झाल्याने प्रशासन व सेंटर यांच्यातील संगनमताचा संशय व्यक्त केला जात होता.
याविषयी ‘दैनिक सकाळ’ने ५ नोव्हेंबरला वृत्त प्रसारित केले होते. यासोबत फुटपाथच्या बाजूला काही बेकायदा गाळेदेखील उभारले गेले होते. याविषयीदेखील ‘सकाळ’ने वृत्त प्रसारित केले होते. हे वृत्त प्रसारित होताच पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दरम्यान, पालिका कारवाईनंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शहरात अघोषित पाणीटंचाई भेडसावते आहे आणि इथे पाण्याचा बेजबाबदार वापर केला जात होता. ‘सकाळ’ने वृत्त दिल्यानंतर हा प्रकार थांबला, अशी प्रतिक्रिया रहिवाशांनी दिली.
साहित्य हटवले
ग प्रभागाच्या अतिक्रमण हटाव पथकाकडून दोन-तीन दिवसांपूर्वी या बेकायदा वॉशिंग सेंटर आणि गाळ्यावर तोडकामाची कारवाई करण्यात आली. हेमा मुंबरकर यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सेंटरला होणारा पाणीपुरवठा थांबवला आहे. सेंटरवर वापरले जाणारे उपकरण, पाइप व इतर साहित्य हटवण्यात आले आहेत.
दंडात्मक कारवाई
सहाय्यक प्रभाग आयुक्त हेमा मुंबरकर यांनी सांगितले, फुटपाथवर वॉशिंग सेंटर उभारणे हे योग्य नाही. कोणत्याही परिस्थितीत असे बेकायदा वॉशिंग सेंटर चालू दिले जाणार नाहीत. पुढे अशा प्रकारचे आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. पुढील काळात शहरातील अनधिकृत वॉशिंग सेंटरची तपासणी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.