सकाळच्या बातमीचा परिणाम
घाटकोपरच्या तरुणाईचा मानवतेचा आदर्श!
थॅलेसेमिया रुग्णांसाठी प्रगती मंच सदस्यांचे रक्तदान
घाटकोपर, ता. १२ (बातमीदार) : मुंबई शहरात सध्या निर्माण झालेल्या रक्ताच्या तीव्र तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल घेऊन घाटकोपर येथील प्रगती मंच या सामाजिक संस्थेच्या १७ उत्साही तरुणांनी अवघ्या चार तासांत एकत्र येत तातडीने रक्तदान केले. थॅलेसेमिया या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या आणि वेळेवर रक्त न मिळाल्यास जीवाला धोका असलेल्या रुग्णांसाठी हे तरुण देवदूत ठरले आहेत.
थॅलेसिमिया रुग्णांना दर १५ दिवसांनी किमान दोन युनिट रक्ताची आवश्यकता असते. रक्ताच्या तुटवड्यामुळे त्यांना वेळेवर रक्त मिळण्यात मोठा अडथळा येत होता. याच समस्येवर ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. विलेपार्ले येथे राहणारा आणि पहिल्याच प्रयत्नात चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा उत्तीर्ण झालेला थॅलेसेमिया रुग्ण कुणाल ममदानी याने घाटकोपरमधील आर्य अंकुशराव यांच्याशी संपर्क साधून तातडीने रक्तदानाची विनंती केली. आर्य यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः रक्तदान केले आणि समाजमाध्यमांच्या (फेसबुक) माध्यमातून घाटकोपरच्या तरुणांना त्वरित मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत घाटकोपर प्रगती मंचच्या १७ सदस्यांनी अवघ्या चार तासांत एकत्र येऊन रक्तदान केले. या उपक्रमामुळे थॅलेसेमिया रुग्णांना तातडीची मदत मिळाली आणि अनेकांचे जीव वाचले.
या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना थॅलेसेमिया रुग्ण कुणाल म्हणाले, की समाजात अजूनही माणुसकी जिवंत आहे, हे दाखवून देणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.
मानवी शरीरातूनच रक्तनिर्मिती
तज्ज्ञांच्या मते, रक्त हा असा घटक आहे की तो केवळ मानवी शरीरातूनच तयार होऊ शकतो. कोणतेही रासायनिक किंवा कृत्रिम माध्यम रक्तनिर्मिती करू शकत नाही. यामुळे रक्तदान किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
आज ‘सकाळ’मधील रक्ताचा तुटवडा कमी असल्याचे वृत्त वाचल्यानंतर आम्ही रक्तदान करण्यासाठी एकमेकांना फोन केले. १७ जण त्वरित तयार झाले. तसे दरवर्षी आम्ही मंचच्या माध्यमातून रक्तदान उपक्रम घेत असतो.
- अभिषेक पवार, प्रगती मंच