शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी मुख्याध्यापक निलंबित
मनसेकडून ‘ॲट्रॉसिटी’ गुन्ह्याची मागणी
अंबरनाथ ता. १२ (वार्ताहर) : अंबरनाथ तालुक्यातील जावसई जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मोठा घोटाळा उघडकीस आल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. मनसेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर या प्रकरणात अखेर संबंधित मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे.
अंबरनाथ पश्चिम येथील जावसई जिल्हा परिषद शाळेत सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षांपासून मिळाली नव्हती. पालकांनी शाळेकडे विचारणा केली असता धक्कादायक प्रकार समोर आला. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणारी ही शिष्यवृत्तीची रक्कम मुख्याध्यापकाने खोटे अंगठे घेऊन रोख स्वरूपात वाटप केली आणि त्याची रजिस्टरमध्ये नोंद ठेवली होती. या प्रकारामुळे संतप्त पालकांनी गटशिक्षणाधिकारी विशाल पोतकर यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी मुख्याध्यापक अरुण वाणी यांना कारणे दाखवा नोटीस बजावून चौकशी केली. चौकशीअंती मुख्याध्यापकच यासाठी जबाबदार असल्याचे निष्पन्न झाल्याने शिक्षण विभागाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे; मात्र या घोटाळ्यामुळे आदिवासी समाजामध्ये संतापाचे वातावरण असून, विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, आता या विद्यार्थ्यांची थांबलेली शिष्यवृत्ती कधी मिळणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
आंदोलनाचा इशारा
मनसेने या संपूर्ण प्रकरणात सातत्याने पाठपुरावा करून निलंबनाची कारवाई घडवून आणली; मात्र मनसे एवढ्यावरच थांबण्यास तयार नाही. मनसेचे विभागाध्यक्ष जयेश नंदू केवणे यांनी या कारवाईवर असमाधान व्यक्त केले आहे. फक्त निलंबन पुरेसे नाही, हा आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गंभीर अन्याय आहे. त्यामुळे संबंधित मुख्याध्यापकावर ॲट्रॉसिटी (अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक) गुन्हा दाखल करावा, अशी ठाम मागणी मनसेने केली आहे. जर ही मागणी पूर्ण झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेने दिला आहे. या मागणीसंदर्भात जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, ठाणे जिल्हाधिकारी, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे.