११ दिवसांत ३.४३ लाखांचा दंड
वाशी विभागात २६५ वाहनचालकांवर कारवाई
नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : वाशी परिसरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार ११ दिवसांमध्ये विशेष मोहीम राबवून तब्बल ३.४३ लाखांचा दंड वसूल केला आहे.
वाहतूक विभागाचे पोलिस उपआयुक्त तिरुपती काकडे यांच्या सूचनेनुसार वाशी वाहतूक शाखेच्या वतीने १ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत ही मोहीम राबवली होती. या काळात २६५ वाहनचालकांकडून तीन लाख ४३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चार जणांवर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे २७९ प्रकरणे न्यायालयात दाखल केली गेली असून, २३ वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या कारवाईत धोकादायक स्टंट करणाऱ्या यूट्युबर यांचा समावेश आहे.
------------------------------
तत्काळ दंड भरा
वाशी वाहतूक शाखेच्या वतीने परिसरातील गर्दीची ठिकाणे, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती कार्यक्रम करत आहे. तसेच तरुणांनी सोशल मीडियासाठी स्टंट करू नये, याबाबत प्रबोधन केले जात आहे. नागरिकांनी १३ डिसेंबरला होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीत वाहनांवरील प्रलंबित दंड तत्काळ भरावा, असे आवाहन वाशी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील शिंदे यांनी केले आहे.