आरक्षणानंतर अनेकांचा पत्ता कट
वसई-विरारमध्ये इच्छुकांच्या पदरी निराशा
वसई ता. १२ (बातमीदार) : वसई-विरार शहर महापालिका निवडणुकीची प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर सर्वांचे लक्ष आरक्षणाकडे लागले होते. मंगळवारी (ता. ११) आरक्षण जाहीर होताच वसई-विरारच्या राजकीय वर्तुळात कुठे आनंद, तर कुठे मोठा हिरमोड झाल्याचे दिसून आले. आरक्षणाच्या फेऱ्यात अनेक इच्छुकांना मोठा फटका बसला असून, त्यांची पदरी निराशा आली आहे. महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, खुला प्रवर्ग आणि ओबीसी महिला या प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले आहे.
आरक्षण जाहीर होताच अनेक इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागात कोणते आरक्षण आहे, हे तपासण्यास सुरुवात केली. ज्यांचा वॉर्ड लढण्यासाठी सुरक्षित झाला, त्यांनी आनंद व्यक्त केला; मात्र आरक्षणामुळे ज्यांचा पत्ता कट झाला, अशा अनेकांनी आता उमेदवारी मिळणार नाही म्हणून चुप्पी साधली आहे. महापालिकेत एकूण ११५ सदस्यसंख्या असणार आहे. त्यापैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असून, उर्वरित जागांवर आरक्षण जाहीर झाले आहे. ज्या प्रभागात महिलांसाठी आरक्षित किंवा खुल्या प्रवर्गातून जागा सोडण्यात आल्या आहेत, त्याच प्रभागात अन्य दोन जागांवर आपल्याला संधी मिळेल, अशी आशा आता काही इच्छुकांमध्ये निर्माण झाली आहे.
बविआला भाजपचे आव्हान
वसई-विरार शहर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक गेल्या पाच वर्षांपासून अधांतरी होती. अखेर निवडणूक होणार असल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत; मात्र आरक्षणामुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. येत्या निवडणुकीत महापालिकेवर एकहाती सत्ता असलेल्या बहुजन विकास आघाडीला (बविआ) भाजपच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
इच्छुकांची लगबग
अशातच, पुढील राजकीय समीकरणे काय असतील, कोण कोणाशी युती करणार? अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात किती जण उतरणार? अन्य कोणते पक्ष स्वबळावर किंवा युती करून निवडणूक लढवतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, आरक्षणामुळे इच्छुकांनी आपला वॉर्ड पिंजून काढण्यासाठी लगबग सुरू केली आहे, पण आता पक्षाकडून तिकीट मिळेल की नाही, याकडे इच्छुकांच्या नजरा खिळून आहेत. त्यामुळे पक्षांचे नेमके राजकीय समीकरण काय असेल आणि आरक्षणानुसार तिकिटासाठी कोणाला पसंती दिली जाईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.