‘कमळ’ फुलवण्यासाठी जोरदार तयारी!
कर्जत नगराध्यक्ष निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी
कर्जत, ता. १३ (बातमीदार) : आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपचे रायगड जिल्हा निवडणूक प्रमुख आणि आमदार प्रशांत ठाकूर सध्या कर्जत दौऱ्यावर असून, त्यांनी अनेक मान्यवरांशी चर्चा केली. याचदरम्यान, त्यांनी माजी आमदार सुरेश लाड यांची विशेष भेट घेतली. या भेटीत आमदार ठाकूर यांनी सुरेश लाड यांच्या सुनबाई डॉ. स्वाती लाड यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्याची विनंती केली आहे. यामुळे डॉ. स्वाती लाड या भाजपच्या संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत.
भाजपच्या विनंतीवर माजी आमदार सुरेश लाड यांनी सावध भूमिका घेतली आहे. मी माझ्या भावकी, ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतरच अंतिम निर्णय जाहीर करेन, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार बुधवारी (ता. १२) रात्री दहिवली पाटील आळी येथे सुरेश लाड यांच्या समर्थकांची आणि ग्रामस्थांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीनंतर स्वाती लाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. कर्जत नगर परिषदेत अनेक वर्षांनी भाजपचे कमळ उमलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नगराध्यक्षपद जिंकण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असून, पक्षात सध्या उत्साहाचे (चैतन्याचे) वातावरण आहे.
महायुतीचे समीकरण अनिश्चित
नगराध्यक्षपदासाठी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपला समर्थन देण्याबाबत चर्चा सुरू आहे. भाजप-शिवसेना-आरपीआय अशी महायुती म्हणून निवडणूक लढविण्याची शक्यता सर्वाधिक आहे. माजी आमदार महेंद्र थोरवे यांनीही मंगळवारी सुरेश लाड यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते भाजपशी संवाद साधत असल्याने, महायुतीच्या अंतिम समीकरणाबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे.
निर्णायक भूमिका
ग्रामीण आणि शहरी भागात भाजपची ताकद वाढत आहे. कर्जतसह रायगड जिल्ह्यात आम्ही संघटन मजबूत केले आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले आहे. प्रत्येक जिल्ह्याचे राजकीय चित्र वेगळे असल्याने स्थानिक पातळीवर मान्य होईल, असा निर्णय घेण्याचा आदेश आम्हाला प्रदेश पातळीवरून मिळालेला आहे. भाजपची भूमिका निश्चितच निर्णायक असेल. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सुरेश लाड यांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहात आहोत. त्यांचा निर्णय मिळाल्यावर आम्ही पुढील कार्यवाही जाहीर करू, असे नमूद केले.