राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर!
मुरुड, ता. १३ (बातमीदार) ः मुरूड नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने रणशिंग फुंकले असून, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (ता. १२) निवड केलेल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी महिला आरक्षण असल्याने माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर यांची कन्या आराधना दांडेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मंगेश दांडेकर यांनी सलग दोन टर्म नगराध्यक्षपद भूषविल्यामुळे त्यांचा प्रशासकीय अनुभव आणि जनसंपर्क थेट नगराध्यक्ष निवडणुकीत कन्येला लाभदायक ठरू शकेल, असा अंदाज आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुरूड नगर परिषद निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रभागनिहाय उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. प्रभाग क्रमांक २ अ मधून प्रीता चौलकर, प्रभाग क्रमांक २ ब मधून राकेश मसाल, प्रभाग क्रमांक ३ ब मधून मंगेश दांडेकर, प्रभाग क्रमांक ४ अ मधून डॉ. विश्वास चव्हाण, प्रभाग क्रमांक ४ ब मधून तरन्नुम फराश, प्रभाग क्रमांक ५ अ मधून प्रमिला माळी, प्रभाग क्रमांक ५ ब मधून तमिम धाकम, प्रभाग क्रमांक ६ ब मधून शबाना सुर्वे, प्रभाग क्रमांक ७ अ मधून वासंती उमरोटकर, प्रभाग क्रमांक ७ ब मधून अमित कवळे, प्रभाग क्रमांक ८ ब मधून अँड. मृणाल खोत आणि प्रभाग क्रमांक १० ब मधून हसमुख जैन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सध्या ही पहिली यादी जाहीर झाली आहे. सहकारी पक्षांशी चर्चा झाल्यावर उर्वरित उमेदवारांची नावे लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत, मात्र सहयोगी मित्रपक्ष अद्याप निश्चित झालेले नाहीत. या कार्यक्रमाला मुरूड तालुका अध्यक्ष फैरोज घलट्रे, कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन मनोज भगत, सचिव विजय पैर, मुरूड शहर अध्यक्ष संजय गुंजाळ, माजी नगरसेवक प्रकाश सरपाटील, वासंती उमरोटकर, विश्वास चव्हाण, हसमुख जैन आदींसह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक कामाची पार्श्वभूमी
अनिकेत तटकरे यांनी यादी जाहीर करताना म्हटले की, सर्व उमेदवार जनमानसात परिचित असून सामाजिक कामाची पार्श्वभूमी असलेले आहेत. आमचे हे राष्ट्रवादीचे शिलेदार निश्चित निवडून येणार असून, मुरूड नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्रपक्षाचा झेंडा फडकलेला पाहावयास मिळणार.