किरकोळ वादातून तरुणाची हत्या
मानपाडा पोलिसांकडून सहा जणांना अटक
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १२ ः डोंबिवलीत शनिवारी (ता. ८) आकाश सिंग या तरुणाची किरकोळ वादातून हत्या झाल्याची घटना घडली होती. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी मानपाडा पोलिसांनी विशेष पथके तयार केली होती. याप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अमर महाजन, अक्षय वागळे, अतुल कांबळे, नीलेश ठोसर, प्रतीक सिंग, लोकेश चौधरी अशी अटक आरोपींची नावे आहेत.
डोंबिवलीमधील मालवण किनारा हॉटेलच्या बाहेर शनिवारी रात्री एकच्या सुमारास ही हत्येची घटना घडली. आकाश हा डोंबिवलीतील एका हॉटेलमधून बाहेर पडत असताना त्याचा एका अनोळखी तरुणाला धक्का लागला. या किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद एवढा वाढला, की त्या तरुणाने मित्रांना घटनास्थळी बोलावून घेतले आणि आकाशवर धारदार शस्त्राने वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या आकाशचा मृत्यू झाला. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.