राजस्थानची संत्री नागपूरवर भारी
पावसामुळे दर्जा खालावला, चांगला भाव मिळणार
वाशी, ता. १३ (बातमीदार)ः नवी मुंबईच्या एपीएमसी फळ बाजारात नोव्हेंबरमध्ये नागपूरसह विदर्भातील संत्री दाखल होतात. पण यंदा पावसामुळे झाडांवरील फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राजस्थानमधून येणाऱ्या संत्र्यांना चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईच्या बाजारात संत्र्याची आवक घटल्याने दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच पावसामुळे नागपूरच्या संत्र्यांचा दर्जा खालावला असून, अनेक फळांवर डाग पडले आहेत. त्यामुळे विक्रीयोग्य माल कमी नसल्याने त्याचा फटका उत्पादकांना बसला आहे. सध्या एपीएमसीच्या फळ बाजारात नागपूर आणि नगर भागातून संत्री येत आहेत. तर नोव्हेंबरच्या अखेरीस राजस्थानमधून संत्री येणार आहेत. परंतु सध्याची आवक पाहता राजस्थानच्या संत्र्यांना चांगला भाव मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आंबट-गोड संत्र्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
------------------------------
१० ते १२ ट्रक आवक
नोव्हेंबरमध्ये ४० ते ५० ट्रक संत्री बाजारात येत असतात. यंदा १० ते १२ ट्रक संत्रीच येत आहेत. आवक घटल्याने आकारमानानुसार घाऊक बाजारात संत्र्याचे दर ४० ते ६० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. चांगल्या प्रतीच्या संत्र्यांची कमतरता असल्याने काही माल ९० ते १०० रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये किलोला तर चांगल्या प्रतीचा १२० ते १४० रुपये किलोला विकला जात आहे.