निवडणूक आरक्षण सोडतीने प्रस्थापितांना फटका
कल्याण-डोंबिवलीतील अनेक माजी नगरसेवकांवर नवा प्रभाग शोधण्याची वेळ
कल्याण, ता. १३ (वार्ताहर) : पालिका निवडणुकीच्या १२२ जागांचे प्रभाग आरक्षण सोडत मंगळवारी (ता. ११) जाहीर झाली. या सोडतीत पालिकेचे अनेक माजी नगरसेवक, नगरसेविकांना आरक्षणाचा फटका बसला असून, त्यांना आता अन्य प्रभागातून निवडणूक लढण्याची नामुष्की ओढवणार आहे.
सार्वत्रिक पालिका निवडणुकीत १२२ सदस्य निवडीसाठी प्रथमच बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक घेतली जाणार आहे. पालिकेच्या १२२ प्रभागासाठी चार सदस्यांचा एक पॅनेल या पद्धतीने निवडणूक घेण्यासाठी चार सदस्यांचे २९ प्रभाग व तीन सदस्यांचे दोन प्रभाग, असे ३१ प्रभाग जाहीर करण्यात आले होते. या ३१ प्रभागांतील १२२ जागांसाठी एससी, एसटी, ओबीसी, सर्वसाधारण वर्गासह त्यातील महिलावर्गासाठी आरक्षित असलेल्या जागाकरिता प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीत अनेक माजी नगरसेवक, नगरसेविकांना धक्का बसला आहे.
घरातील महिलांना उमेदवारी
डोंबिवली पूर्वेतील प्रभाग क्र.२६ मधील चार जागांसाठी जाहीर झालेल्या सोडतीत दोन जागा सर्वसाधारण महिलांसाठी, तर प्रत्येकी एक-एक जागा सर्वसाधारण व मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने या प्रभागातील मागच्या निवडणुकीत निवडून आलेले भाजपचे संदीप पुराणिक, मुकूंद पेडणेकर, विश्वदीप पवार व मंदार हळबे या चारही माजी नगरसेवकांना आरक्षणाचा फटका बसला आहे. या चार जागांपैकी दोघांना आपल्याच घरातील महिला सदस्यांना निवडणूक रिंगणात उभे करता येईल, तर उर्वरित दोन जागांपैकी एक जागा सर्वसामान्य वर्गासाठी आरक्षित असल्याने यातील एकाचे पुनर्वसन होईल.
अशीच परिस्थिती कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्रमांक सहामध्ये निर्माण झाली आहे. मागच्या निवडणुकीत मनसेच्या कस्तुरी देसाई व तृप्ती भोईर तर शिंदे गटाच्या नीलिमा पाटील व वैजयंती गुजर घोलप या चार महिला माजी नगरसेविका निवडून आल्या होत्या. या प्रभागातील चार जागांपैकी दोन जागा सर्वसाधारण महिला, तर प्रत्येकी एक जागा सर्वसाधारण व मागास प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने दोघांनाच महिलावर्गातून संधी मिळेल, तर एक माजी नगरसेविका सर्वसाधारण वर्गातून निवडणुकीला उभ्या राहू शकतात.
अनेक माजी नगरसेवकांना नवा प्रभाग शोधण्याची वेळ
- कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्र. पाचमधून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक रवी पाटील यांनी त्यांच्या मुलासाठी तयारी सुरू केली होती, मात्र त्यांच्या या प्रभागातील चारही जागा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, महिला व सर्वसाधारण महिलावर्गासाठी आरक्षित झाला आहे.
- तर भाजपचे माजी नगरसेवक व माजी शहरप्रमुख वरुण पाटील हे मागच्या वेळी निवडून आलेल्या आधारवाडी प्रभागाची फोड करून नव्याने निर्माण करण्यात आलेल्या काही प्रभागांना जोडला असून मोठ्या प्रमाणात याचा भाग प्रभाग क्र. एकमध्ये समाविष्ट केला आहे. कल्याणमधील मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांचा जुना प्रभाग साई चौक हा इतर तीन प्रभागांत विखुरल्याने त्यांनादेखील नवीन प्रभाग पाहावा लागणार आहे.
- आंबिवली गावठाण प्रभागातून मागच्या निवडणुकीत अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवडून आलेले शिंदे पक्षाचे माजी नगरसेवक गोरख जाधव यांचा प्रभाग नव्याने निर्माण केलेल्या प्रभाग क्र. तीनमध्ये समाविष्ट झाल्याने या प्रभागातील एक जागा अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने गोरख जाधव यांना या आरक्षणाचा फटका बसला आहे.
पक्षांमध्ये अंतर्गत स्पर्धा आणि नाराजीची शक्यता
डोंबिवलीतील भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेले काँग्रेसचे माजी नगरसेवक हृदयनाथ भोईर आणि नंदू म्हात्रे यांच्या जुन्या प्रभागाचा भाग विभागला गेल्याने आता त्यांनी प्रभाग क्र. २५ मधून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे, मात्र या ठिकाणी आधीच भाजपचे दोन माजी नगरसेवक निवडून आलेले असताना त्यांचा पत्ता कट करून त्यांना उमेदवारी दिली जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे या प्रभागात पक्षांतर्गत स्पर्धा आणि नाराजीची शक्यता निर्माण होऊ शकते.