बिबट्याच्या वावराबाबत वन विभागाची जनजागृती
कल्याण, ता. १३ (वार्ताहर) : तालुक्यातील मौजे रोहण, वाहोली येथे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या राखीव वनातील बिबट्याचा संचार वाढला आहे. याबाबत वन विभाग कल्याण वन परिक्षेत्र व प्राणीमित्र कल्याण-डोंबिवली, टिटवाळा विभाग यांच्या वतीने मौजे रोहण येथील हनुमान मंदिराच्या सभामंडपात ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली.
कल्याण वन परिक्षेत्र अधिकारी नीलेश आखाडे, विशाल कंथारिया, सुहास पवार व प्राणी टीम व रिहान साहिर मोतीवाला (निसर्गतज्ज्ञ) व दहागाव वनपाल मुरलीधर जागकर, वनरक्षक सुशांत निकम, मोहिनी शेळके यांच्या उपस्थित सभा पार पडली. या सभेत पंचक्रोशीतील स्थानिकांना आणि ग्रामस्थांना बिबट्या या वन्यप्राण्यापासून आपले व परिवाराचे स्वसंरक्षण कसे करता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आपल्या परिसरात बिबट्या दिसून आल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क करावा, असे आवाहनही या वेळी करण्यात आले. या सभेस सरपंच सखाराम रोहणे, उत्तम रोहणे, ॲड. जयेश मोहिते, पुंडलिक गायकर, समाज कार्यकर्ते व ग्रामस्थ मंडळ रोहण आदी उपस्थित होते.
उपाययोजना
बिबट्या या वन्यप्राण्याच्या संचाराबाबत योग्य त्या उपाययोजना संध्याकाळी किंवा सकाळी एकट्याने बाहेर न फिरणे, बाहेर आवश्यक कामांकरिता जात असताना दोघा-तिघांसह जाणे, आपल्या घरासभोवतालचा परिसर साफ ठेवणे, लहान मुलांना व आपले घरातील वयस्कर माणसांना एकटे न सोडणे, रात्री बाहेर पडताना काठी व बॅटरीचा वापर करणे, रस्त्याने जात-येत असता आपल्या मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावणे, आपले गावाचे सार्वजनिक आणि अंतर्गत रस्त्यावर मोठे हॅलोजन/लॅम्प लावून परिसर प्रकाशमान करणे, गावातील कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावणे, गावाजवळ कचरा न टाकणे, आपले ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसुरक्षा कमेटी/दल तयार करून गावात आळीपाळीने रात्री गस्त घालणे. यामुळे बिबट्या आपल्या गावाजवळ येणार नाही, असे सभेत सांगण्यात आले.
पक्षी सप्ताह साजरा
कल्याण (वार्ताहर) ः ५ ते १२ नोव्हेंबर हा आठवडा पक्षी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त दहागाव परिमंडळ, वनपाल जागकर यांच्या पुढाकाराने मौजे. रोहण हनुमान मंदिर सभागृह, मौजे. रायते पद्मश्री अण्णासाहेब जाधव महाविद्यालय, जिल्हा परिषद शाळा आपटी, जागृती महाविद्यालय दहागाव इत्यादी ग्रामपंचायत आणि शाळा-महाविद्यालयात पक्षी सप्ताह साजरा करण्यात आला. याप्रसंगी कल्याण वन परिक्षेत्रक अधिकारी व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.