रस्त्यावरचं जगणं, सिग्नलवर बालपण!
पनवेलमधील डोंबारी, बेघर मुलांची जगण्यासाठी धडपड
(लोगो बालदिन विशेष )
वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. १३ ः दिवसभर लोकांचे मनोरंजन करण्यासाठी दोरीवर कसरत करणारे, ड्रम आणि झांज वाजवत नाचणारे लोक रात्री मात्र कळंबोली उड्डाणपुलाखाली किंवा त्याच्या आजूबाजूच्या झोपड्यांमध्ये डोके टेकवतात. त्यांची मुलेही आयुष्याची कसरत करत आहेत, पण ही कसरत शिक्षण, जगण्यासाठी नसून अस्तित्व टिकवण्यासाठी असल्याने डोंबारी समाजातील लोकांच्या आयुष्याची वेदना अधिकच अधोरेखित करतात.
‘उद्याच्या भाकरीची काळजी कशाला, आभाळ पांघरू अन दगड उशाला...’ या ओळी जशा ऐकायला काव्यात्म वाटतात, पण पनवेल परिसरातील वास्तवाचे चित्रही रेखाटतात. पनवेल, कळंबोली, खारघर परिसरात सिग्नलवर भिक्षा मागणारी, देवासाठी हार विकणारी किंवा चालकांकडे पैशांची याचना करणारी लहान मुले सहज दिसतात. काही मुली भाविकांच्या मागे धावतात, तर काही लहान मुले गाड्यांपुढे पैशांसाठी नाचतात. शिक्षणाचे वय व्यवसायात आणि उपजीविकेत हरवते. दोन वेळच्या चटणीभाकरीसाठी बालपणाची मोठी किंमत मोजावी लागते.
----------------------------
शैक्षणिक प्रगतीवर प्रश्नचिन्ह
- आसूडगाव परिसरात काही वर्षांपूर्वी झोपड्यांची वस्ती होती. तिथे मुलांसाठी ओपन स्कूल सुरू करण्यात आले होते, मात्र कळंबोली जंक्शनच्या विस्तारीकरणाच्या कामात ही वस्ती विस्थापित झाली. त्यानंतर अनेक कुटुंबे विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन निवाऱ्यासाठी फिरत आहेत.
- शासनाकडून पुनर्वसनाची योजना जरी जाहीर झाली असली तरी प्रत्यक्षात काहीच हालचाल नाही. काही मुलांना स्थानिक शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला असला, तरी स्थिर निवासाचा अभाव, पालकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर प्रश्नचिन्ह आहेत.
----------------------------
शासनाच्या योजना कागदावर
रस्त्यावर राहणाऱ्या, एकल, अनाथ व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने फिरते पथक योजना जाहीर केली होती. याअंतर्गत राज्यातील २९ महापालिकांमध्ये प्रत्येकी एक आणि मुंबई महापालिकेच्या पूर्व-पश्चिम उपनगरांसाठी प्रत्येकी एक असी ३१ फिरते पथक सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. बेघर मुलांना शिक्षण, आरोग्यसेवा, अन्न आणि संरक्षण मिळवून देणे, तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणणे. परंतु आजच्या घडीला योजनेची अंमलबजावणी झालेली दिसत नाही.
-----------------------------
पनवेल परिसरातील डोंबारी समाजातील मुले अजूनही शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेच्या अधिकारापासून वंचित आहेत. प्रशासन, समाजसेवी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी अशा मुलांकडे लक्ष देऊन शिकण्याची आणि जगण्याची संधी देणे, ही काळाची गरज आहे.
- वैशाली जगदाळे, संकल्प शैक्षणिक व सामाजिक संस्था.