रस्त्याला शहीद मुरली नाईक यांचे नाव द्या!
घाटकोपरमधील रहिवाशांची मागणी
घाटकोपर, ता. १५ (बातमीदार) ः घाटकोपर पूर्वेतील कामराज नगर परिसरातील स्थानिक, मूळ रहिवासी एम. श्रीराम नाईक व ज्योतीबाई नाईक यांचे सुपुत्र एम. मुरली नाईक (२३) यांना शत्रूशी लढताना विरमरण आले. त्यांच्या स्मृती कायम जिवंत राहाव्यात, यासाठी नवीन पुनर्विकसित वसाहतीतील मुख्य रस्त्यास ‘शहीद मुरली नाईक’ यांचे नाव देण्याची मागणी होत आहे.
देशसेवेची तीव्र ओढ मनात बाळगणाऱ्या मुरली नाईक यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर म्हणून भारतीय सैन्यात प्रवेश घेतला व ८५१-लाईट रेजिमेंटमध्ये सेवेत रुजू झाले. ९ मे २०२५ रोजी पहाटे ३.३० वाजता जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टर येथे झालेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. देशासाठी लढताना त्यांना वीरमरण आले.
मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या संयुक्त प्रकल्पांतर्गत येथे २२ मजली इमारतींचे आधुनिक पुनर्विकास संकुल उभारले जात आहे. या प्रकल्पातून १६ हजार ५७५ मोफत घरे स्थानिक मूळ रहिवाशांना देण्यात येणार आहेत. या नव्या वसाहतीतील मुख्य रस्ता किंवा कॉलनीतील चार रस्ते एकत्र येतात त्या प्रमुख चौकाला ‘शहीद जवान एम. मुरली नाईक मार्ग’ किंवा ‘शहीद मुरली नाईक चौक’ असे नाव देण्याची स्थानिक रहिवाशांसह तेलुगू समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भुमय्या बट्टु यांनी मागणी केली आहे.
गणेश भुमय्या बट्टु यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहीद जवान मुरली नाईक यांनी देशासाठी प्राणार्पण करून घाटकोपरचा गौरव वाढवला आहे. त्यांच्या शौर्याची आठवण पिढ्यान्पिढ्यांना राहावी म्हणून नवीन कॉलनीतील मुख्य रस्ता किंवा चौक त्यांच्या नावाने घोषित करावा.