पंजाबमधून हेरॉइन, अफीमची तस्करी
नवी मुंबई पोलिसांकडून तळोज्यातून दोघांना अटक
नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : पंजाबमधून तळोज्यात अमली पदार्थांच्या विक्रीच्या रॅकेटचा नवी मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल एक कोटी १७ लाख १९ हजारांचे हेरॉइन, अफीम जप्त करण्यात आले असून, दोघा भावांना अटक केली आहे.
तळोजा परिसरामध्ये अमली पदार्थांचे मोठे रॅकेट सुरू असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी (ता. १४) तळोजा फेज-२ मधील हेरिटेज कॅसल इमारतीवर छापा मारला होता. या कारवाईत १५८ ग्रॅम हेरॉईन (किंमत १,१६,१९,०००) आणि ४० ग्रॅम अफीम (किंमत १,००,५००) जप्त करण्यात आले. तसेच ट्रकचालक असलेले नवज्योतसिंग ऊर्फ विकी रंधावा (३४), गुरज्योतसिंग ऊर्फ सनी रंधावा (३२) या दोघा भावांना २१(बी),२१(सी) व २९ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
-----------------------------------
पुरवठादार, विक्रेत्यांचे जाळे
पंजाब येथून नवी मुंबईत अमली पदार्थ आणून देणारा मुख्य पुरवठादार तसेच नवज्योतसिंग, गुरज्योतसिंग मार्फत ग्राहकांना अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या चौघांचा रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.