उल्हासनगरमध्ये ‘ऑपरेशन टायगर’
टीम ओमी कलानी, शिंदे गटाचा भाजपला मोठा धक्का
उल्हासनगर, ता. १५ (वार्ताहर) : शहराच्या राजकीय रंगमंचावर गेल्या काही दिवसांत अशी नाट्यमय घडामोड घडली आहे, ज्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीचे संपूर्ण समीकरण एका झटक्यात बदलून गेले. भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि टीम ओमी कलानी यांनी संयुक्तपणे ‘ऑपरेशन टायगर’ राबवले. हा केवळ प्रवेश सोहळा नसून आगामी राजकीय कथानकाला संपूर्णपणे नवे वळण देणारा ‘ऐतिहासिक क्षण’ ठरला आहे.
एका बाजूला बिहारमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या विजयाचा उत्साह देशभरात होता, त्याच दिवशी उल्हासनगरमध्ये भाजपला बसलेला हा मोठा धक्का स्थानिक नेतृत्वासाठी गंभीर इशारा ठरला आहे. शहरातील सहा माजी नगरसेवकांनी अचानक भाजपचा निरोप घेऊन शिवसेना (शिंदे गट)– टीम ओमी कलानीच्या ‘दोस्ती का गठबंधन’चा हात धरला. या मोठ्या गळतीमुळे भाजपला केवळ संघटनात्मक धक्काच नाही, तर महापालिका निवडणुकीच्या संपूर्ण रणनीतीला मोठा हादरा बसला आहे.
भाजपमध्ये असंतोष
भाजपमधील ही मोठी गळती अचानक झालेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून उल्हासनगरात नव्या नेतृत्वाचा वाढता प्रभाव, जुन्या नेत्यांना डावलले जात असल्याची भावना आणि तिकीट वितरणातील अनिश्चितता यामुळे हा असंतोष खदखदत होता. भाजप या असंतोषावर ‘उपचार’ करू शकला नाही आणि या पोकळीचा अचूक अंदाज घेत टीओके-शिंदे गटाने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ने या असंतोषाला कुशल राजकीय नियोजनाची धार दिली.
अनुभवी राजकीय निरीक्षकांच्या मते, या सहा नेत्यांचा प्रभाव विविध समाजगटांमध्ये आणि प्रभागांमध्ये इतका खोलवर आहे की त्यांच्या या एका निर्णयामुळे किमान १२ ते १५ प्रभागांतील समीकरणे थेट बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि टीओके प्रमुख ओमी कलानी यांच्या थेट देखरेखीखाली टीओके-शिंदे गटाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही रणनीती यशस्वी केली आहे.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे राजकारणात ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जातात; मात्र या अचानक झालेल्या धक्क्यामुळे त्यांच्या स्थानिक नेतृत्वापुढे निर्णायक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. संघटनातील जुन्या नेत्यांचा मोठा गट बाहेर पडल्याने केवळ पक्षाची ताकदच कमी झाली नाही, तर उरलेले कार्यकर्तेही पुढील नेतृत्वाबाबत संभ्रमात असल्याची स्थिती राजकीय वर्तुळात आहे.
निवडणुकीचे स्वरूप बदलले
या घडामोडींचा उल्हासनगर पालिका निवडणुकीवर परिणाम होणार आहे. भाजपच्या शक्तीस्थानावर मोठा घाव बसल्यामुळे शहरातील राजकीय लढतीचे स्वरूप एकदम बदलले आहे. पूर्वी त्रिकोणी असलेली लढत आता थेट ‘भाजप विरुद्ध टीओके–शिंदे गट’ अशी रंगणार आहे.
‘ऑपरेशन टायगर’मध्ये सहभागी झालेले माजी नगरसेवक :
जमनु पुरस्वानी, महेश सुखरामानी, प्रकाश माखीजा, राम (चार्ली) पारवानी, मीना सोंडे, किशोर वनवारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.