कशेळी खाडीपूल ठरतेय ‘आत्महत्येचे ठिकाण’
दोन महिन्यांत दोन जणांनी संपवले जीवन; भिंतीची उंची वाढवण्याची मागणी
ठाणे, ता. १५ (बातमीदार) ः ठाणे आणि भिवंडीला जोडणारा कशेळी खाडीपूल आत्महत्येचे ठिकाण ठरत आहे. पुलाची संरक्षक भिंत अवघी तीन फूट उंच असल्याने येथे आत्महत्या होण्याचे प्रकार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या दोन महिन्यांत येथे दोघांनी उडी मारून आत्महत्या केल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे या भिंतीची उंची वाढवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
कशेळी खाडीपूल ठाणे आणि भिवंडीला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या पुलामुळे दोन्ही शहरांमधील दळणवळण वाढले असून, ठाणे, मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतुकीचा भारदेखील काही प्रमाणात कमी झाला आहे. तीन-तीन पदरांच्या दोन उड्डाणपुलामुळे ठाणे आणि भिवंडी शहरे एकमेकांच्या जवळ आली आहेत, मात्र दोन्ही शहरांना जोडणारे हे दोन्ही खाडीपूल आत्महत्या करणाऱ्यांना सोयीस्कर ठरू लागले आहेत. पुलाच्या बाजूने बांधण्यात आलेली भिंत कमी उंचीची असल्याने त्यावर सहजपणे चढता येते. नुकतीच एका टॅक्सी (कॅबचालक) चालकाने पुलाच्या भिंतीवर सहजपणे चढून खाडीत उडी घेतली होती.
दोन दिवसांनंतर त्याचा मृतदेह आढळला होता. पूल उभारल्यापासून याठिकाणी आत्महत्येचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे येथे संरक्षण जाळी उभी करावी अथवा माणसाला भिंतीवर चढता येणार नाही अशा पद्धतीने भिंतीची उंची वाढवावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती रिक्षा-टॅक्सी युनियनने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
दोन्ही पूल खाडीवर बांधण्यात आले आहेत. पुलावरून पाण्यात निर्माल्य टाकण्यासाठी लोक याचा वापर करतात. पुलावर कबुतरांना खायलादेखील दिले जाते, तर अनेक जण पुलाचा वापर आत्महत्या करण्यासाठी करत असल्याचे दिसते. त्यामुळे आणखी आत्महत्या होण्याआधी पुलाचे संरक्षण कठड्यांची उंची वाढवण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
- दयानंद गायकवाड, अध्यक्ष, प्रहार जनशक्ती रिक्षा-टॅक्सी युनियन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.