वाड्यामध्ये भाजपचे शक्तिप्रदर्शन
नगराध्यक्ष पदासाठी रिमा गंधे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; इतर पक्षांचेही अर्ज दाखल
वाडा, ता. १५ (बातमीदार) : वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात भाजपने शनिवारी (ता. १५) जोरदार मोर्चेबांधणी केली. भाजपच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी रिमा गंधे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी मोठे शक्तिप्रदर्शन करीत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. खासदार डॉ. हेमंत सवरा, ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे आणि जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत रिमा गंधे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब अंधारे यांच्याकडे सादर केला.
भाजपने नगराध्यक्ष पदासोबतच नगरसेवक पदासाठी उभ्या केलेल्या मोठ्या फळीमध्ये, प्रभाग क्रमांक १ मधून रामचंद्र भोईर, २ मधून श्वेता उंबरसडा, ३ मधून स्मिता पातकर, ४ मधून आशीष पवार, ५ मधून तेजस पाटील, ६ मधून सिद्धेश भोपतराव, ७ मधून मयूरी म्हात्रे, ८ मधून हरेश कोकाटे, ९ मधून भूमी पाटील, १० मधून मनीष देहेरकर, ११ मधून सविता वनगा, १२ मधून प्रमोद पटारे आणि कुणाल साळवी, १३ मधून हर्षद गंधे, तर १४ मधून रिता थोरात यांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे प्रभाग १ मधून श्याम डागला, प्रभाग ७ मधून रुबीना शेख, प्रभाग ९ मधून अश्विनी भोईर, प्रभाग १६ मधून विराज पाटील आणि प्रभाग १७ मधून सुचिता पाटील यांनी अर्ज दाखल केले. काँग्रेसतर्फे प्रभाग ४ मधून स्नेहल शिरवंदे आणि प्रभाग १२ मधून भारती सपाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाग ९ मधून अमिना चौधरी आणि प्रभाग १३ मधून भुपेश जगताप यांनी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रभाग १० मधून निखिल पाटील यांनी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी आता अधिकृतपणे सुरू झाली आहे.