भिवंडीत गटारांमध्ये मांसकचरा
भिवंडी, ता. १५ (बातमीदार) : भिवंडी महापालिका क्षेत्रात शेकडोच्या संख्येने कोंबड्या व इतर मटण विक्रीची दुकाने रस्त्याच्या कडेला गटारावर आहेत. जवळजवळ सर्वच दुकानांमधून काही ना काही मांसाचे तुकडे आणि इतर कचरा गटारांमध्ये टाकला जातो. त्यामुळे गटारातील सांडपाण्याबरोबर या साचलेल्या घाणीने विविध आजार शहरात पसरत आहेत. गटारांमधून महापालिकेच्या जलवाहिन्या गेल्या आहेत. अशात गळती लागलेल्या जलवाहिनीतून अनेक वेळा अशुद्ध पाणी नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याने अशा प्रकारच्या व्यावसायिकांवर कारवाई करावी. तसे, मांसाच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची स्वतंत्र यंत्रणा पालिकेच्या स्वच्छता विभागाने राबवावी, अशी मागणी शहरातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
शहरातील अनेक भागांत नागरिकांना अशुद्ध पिण्याचे पाणी मिळत असून, त्यामुळे नागरिकांना पोटाचे विकार, त्वचारोग आणि इतर आजार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी गटारे व पाथवेज बांधणीच्या कामांत व्यस्त असताना नागरिकांना सुरक्षित पिण्याचे पाणी देण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. भिवंडीत अनेक मुख्य व आतील रस्त्यांवर कोंबडी व जनावरांच्या मासाची दुकाने आहेत. कोंबडी, बकरी, मेंढी, म्हैस आदी जनावरांचे मांस, अवशेष गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. अनेक ठिकाणी दुकानांच्या मागेच किंवा गटारालगत जनावरांची कत्तल केली जाते. मोठ्या जनावरांची कत्तल कत्तलखान्याऐवजी आडबाजूला करून त्यातील कचरा थेट नाल्यात सोडला जातो. पावसाळ्यात या उघड्या गटारातील पाणी व नाल्याचे पाणी रस्त्यावर वाहत येते आणि याच दूषित पाण्यात भाजी मंडईतील भाजीपाला व फळे भिजून दुसऱ्या दिवशी विक्रीस येतात. आरोग्य विभागाकडून कोणतीही काटेकोर कारवाई न होणे ही मोठी प्रशासनिक त्रुटी आहे.
जागृतीचा अभाव
झोपडपट्टी आणि दाट लोकवस्तीच्या भागात स्वच्छतेबाबत जागृतीचा अभाव मोठ्या प्रमाणात जाणवतो. त्यामुळे लहान मुलांसह प्रौढांनाही विविध आरोग्य समस्या उद्भवत आहेत. गटारे, ड्रेनेज आणि सांडपाणी यांचे आवश्यक ते वर्गीकरण न झाल्याने ही परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. याचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहे. महापालिकेच्या कार्यालयात शुद्ध व थंड पाणी यंत्रणा असतानाही अधिकारी, कर्मचारी सीलबंद बाटल्यातील पाणी पितात. यावरून पालिकेच्या पाण्याच्या गुणवत्तेबद्दल नागरिकांचा विश्वास डळमळीत झाल्याचे स्पष्ट होते. या सर्व घटनांची महापालिका प्रशासन, वैद्यकीय आणि स्वच्छता आरोग्य विभाग यांनी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
------------------
भिवंडी महापालिकेच्या काही भागांतील जलवाहिन्या गटारातून जात आहेत. त्यांचे नवीन सिमेंटचे रस्ते बनविताना स्थलांतर केले जात आहेत. काही जलवाहिनीला गटाराखाली सिमेंटचे स्लॅब, पॅनल बनवून त्यामध्ये स्थलांतर केले जात आहे. तर काही जलवाहिनी गटाराशेजारी स्थलांतरित केले जात आहेत.
- संदीप पटनावर, प्रभारी कार्यकारी अभियंता
पाणीपुरवठा विभाग, भिवंडी महापालिका
--------------------------
भिवंडीत मोठ्या संख्येने कोंबड्यांची दुकाने आहेत. त्यांची पिसे आणि इतर अनावश्यक भाग जमा करण्यासाठी त्यांनी व्यवस्था केली आहे. ती इतर ठिकाणी वाहून नेऊन टाकली जात आहेत. महापालिकेच्या स्वच्छता विभागात गटारे साफ करणारे कामगार आहेत. त्यांना गटारे साफ करण्यासाठी साधने व वस्तू पालिकेने पुरविल्या आहेत. तरीदेखील मांस विक्रेत्यांची चौकशी करून स्वच्छतेचा आढावा घेतला जाईल.
- जयवंत सोनावणे, स्वच्छता अधिकारी
स्वच्छता व आरोग्य विभाग, भिवंडी महापालिका
भिवंडी : शहरात ठिकठिकाणी मांसविक्रीची असलेली दुकाने
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.