ऋता आव्हाड निवडणूक रिंगणात
प्रभाग क्रमांक २३ मधून इच्छुक; पक्षांतर केलेल्या नगरसेवकांना पराभूत करण्याची रणनीती
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळवा शहरात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे माजी महापौर मिलिंद पाटील यांच्यासह नऊ नगरसेवकांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कळव्यात पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर आव्हाड गटाने पक्षांतर केलेल्या उमेदवारांच्या प्रभागात तगडे आव्हान उभे करण्याची खेळी सुरू केली आहे. याच रणनीतीचा एक भाग म्हणून डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी प्रभाग क्रमांक २३ मधून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांनी आपला इच्छुक उमेदवारी अर्ज जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्याकडे सादर केला आहे.
अनेक वर्षांपासून कळवा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होते, पण शिंदे गटाने हा बालेकिल्ला पोखरला. आव्हाड यांचे विश्वासू सहकारी आणि माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, माजी नगरसेविका मनाली पाटील, प्रमिला केणी, सुरेखा पाटील यांसारख्या दिग्गजांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. हा आव्हाड यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, पक्षांतरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी आणि शिंदे गटातील उमेदवारांना थेट आव्हान देण्यासाठी ऋता आव्हाड यांनी प्रभाग क्रमांक २३ मधून अर्ज दाखल करून कडवे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
दांडगा जनसंपर्क
ऋता आव्हाड यांचा कळवा आणि मुंब्रा भागात दांडगा जनसंपर्क आहे. विशेषतः कळवा परिसरातील त्यांचे महिला सक्षमीकरणाचे ‘संघर्ष (महिला)’ संस्थेच्या माध्यमातून केलेले काम दखल घेण्याइतपत सक्षम आहे. परिसरातील प्रत्येक घरात त्या वैयक्तिकरीत्या पोहोचलेल्या असल्याने प्रभाग क्रमांक २३मध्ये शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.
चुरशीची लढत
उमेदवारीबद्दल बोलताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी जे नऊ नगरसेवक पक्षांतर करून गेले आहेत; त्यांना ऋता आव्हाड यांच्या उमेदवारीमुळे पराभवच स्वीकारावा लागणार आहे, असा विश्वास व्यक्त केला. ऋता आव्हाड यांच्या निवडणूक रिंगणातील संभाव्य प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक २३ मधील लढत अधिक लक्षवेधी आणि चुरशीची होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.