१०० उठाबशांमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू
शाळेत उशिरा आल्याने वसईतील शिक्षिकेचे कृत्य
नालासोपारा, ता. १५ ( बातमीदार) : वसईच्या सातिवली येथील श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेत १० मिनिटे उशिरा आल्याने शिक्षिकेने सहावीतील विद्यार्थिनीला १०० उठाबशा काढायला लावल्या. त्यामुळे चिमुरडीला श्वास घेण्यास आणि कंबरेला त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा शनिवारी (ता. १५) मृत्यू झाला. या घटनेनंतर विकृत शिक्षिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, त्यांच्यासह शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
काजल गौड असे मृत चिमुरडीचे नाव असून, ती सातिवलीच्या श्री हनुमंत विद्या मंदिर शाळेत सहावीच्या वर्गात शिकत होती. ८ नोव्हेंबरला तिला शाळेत पोहोचण्यास १० मिनिटे उशीर झाल्याने शिक्षिका ममता यादव यांनी पाठीवर दप्तर घेऊन १०० उठाबशा काढायला लावल्याचा आरोप पालकांनी केला. त्यामुळे काजलला श्वास घेण्यास आणि पाय, कंबरेला प्रचंड वेदना झाल्याने तिला वसईतील खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने तिला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, शनिवारी सकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याबाबत कळताच पालक, नातेवाईक आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी शाळेला घेराव घालत संबंधित शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रकरणी जे. जे. रुग्णालयातून अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन त्याबाबत वालीव पोलिस अधिक तपास करीत आहेत.
----
शवविच्छेदन अहवालात विद्यार्थिनीच्या अंगात रक्त कमी असल्याचे नमूद केले आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्या दिवशी शाळेत उशिरा आलेल्या ३०-४० विद्यार्थ्यांना संबंधित शिक्षिकेने उठाबशा काढायला लावले. सीसीटीव्ही, इतर मुलांचे जबाब आणि शाळा प्रशासनाकडे चौकशी केल्यानंतर दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येईल.
- दिलीप घुगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वालीव पोलिस ठाणे
---
विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर आम्ही शाळेला भेट दिली आहे. त्याबाबत चौकशी करून वरिष्ठांना अहवाल पाठवण्यात येईल. संबंधित शाळेला आठवीपर्यंतच मान्यता आहे; मात्र तेथे दहावीपर्यंत वर्ग चालत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबतही अहवाल पाठवला जाईल.
- पांडुरंग गालांगे, गटशिक्षणाधिकारी, वसई
---
शाळेत उशिरा आल्याने शंभर १०० उठाबशा काढायला लावणे चुकीचे आहे. शाळा व्यवस्थापन अतिशय बेजबाबदार आहे. संबंधित शिक्षिकेसह शाळा व्यवस्थापनावरही कठोर कारवाई करण्यात यावी.
- रोहित ससाणे, सामाजिक कार्यकर्ते