भाईंदर, ता. १६ (बातमीदार) : मिरा-भाईंदर भाजपच्या विधी कक्षाचे उपाध्यक्ष हर्ष शर्मा यांच्यावर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांची समाजमाध्यमांवर बदनामी केल्याप्रकरणी नयानगर पोलिस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे. मुझफ्फर हुसेन यांच्या भावावर दाखल असलेल्या गुन्ह्यात हुसेन सहभागी असून, बेकायदा आर्थिक लाभ घेत आहेत, तसेच भावाचे कारवाईपासून संरक्षण करत आहेत, त्याचप्रमाणे नयानगर भागातील पुनर्विकासाचे प्रकल्प रहिवासी सोसायट्यांवर दबाव आणून हुसेन हे प्रकल्प दुसऱ्या विकसकांना देऊ देत नाहीत, असे खोटे आरोप शर्मा यांनी केले आहेत. जनमानसातील आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत व राजकीय उद्देशाने समाजमाध्यमांवर बदनामी करत आहेत, अशी तक्रार हुसेन यांनी नयानगर पोलिस ठाण्यात केली होती.