सुधाकर वाघ : सकाळ वृत्तसेवा
टोकावडे, ता. १६ : मुरबाड तालुक्याची ओळख म्हणून प्रसिद्ध असलेली ‘झिनी’ ही सुगंधी व चविष्ट भाताची पारंपरिक जात आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ग्रामीण भागात असो वा शहरात, या तांदळाची नावावरच डोळे झाकून खरेदी केली जाते. एकेकाळी तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावात या भाताची मोठ्या प्रमाणावर लागवड होत होती; मात्र अवकाळी पाऊस, बदलते हवामान आणि झाडांना लवकर रोगराई लागणे या कारणांमुळे झिनी भाताची शेती झपाट्याने घटली आहे.
सध्या मुरबाड तालुक्यात १५ हजार ५०० हेक्टर क्षेत्र भात लागवडीखाली आहे. त्यापैकी झिनी भाताची लागवड फक्त पाच ते सात हेक्टरपर्यंत मर्यादित राहिली आहे. ‘वायएसआर’, ‘दप्तरी’, ‘इंद्रायणी’ आणि विविध हायब्रीड वाणांनी झिनीची जागा घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मते झिनी भाताचे रोप उंच वाढते, त्यामुळे मुसळधार पावसात ते जमिनीवर पडते आणि उत्पादनाचे मोठे नुकसान होते. या वाणात रोगराईची शक्यता जास्त असून प्रतिहेक्टर उत्पादन कमी मिळते. त्यामुळे उत्पादनक्षम हायब्रीड वाणांना शेतकऱ्यांकडून अधिक पसंती मिळू लागली आहे. मुरबाडची ‘झिनी’ भाताचे वाण तालुक्याच्या कृषी परंपरेचा अभिमान आहे. मात्र, आधुनिक हायब्रीड बियाण्यांच्या स्पर्धेत ही परंपरा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
७० ते ७५ रुपये किलो दर
झिनीची चव, सुगंध आणि गुणवत्ता अपूर्व असल्याने कोकणातील बाजारपेठांमध्ये आजही या भाताला ७० ते ७५ रुपये किलो इतका चांगला दर मिळत आहे. त्यामुळे अजूनही या पारंपरिक भाताची लागवड टिकवून ठेवणाऱ्या काही शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत आहे. परंतु, या नव्या वाणांमध्ये झिनीसारखी चव आणि सुगंध नसल्याची खंत शेतकरी वर्ग व्यक्त करतो.
प्रोत्साहन योजनेची आवश्यकता
१९७२-७५च्या दुष्काळी काळात झिनी भातावर रोगांचे प्रमाण वाढले आणि त्यानंतर या वाणाची लागवड हळूहळू घटू लागली. तरीही नारिवली, बांधिवली, शेलारी, तळेगाव, विढे, म्हसा या गावांतील काही शेतकरी अजूनही ही परंपरा जपत झिनी लागवड करत आहेत. कृषी तज्ज्ञांच्या मते, झिनी भाताचे उत्तम प्रतीचे बियाणे तयार करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्यास आणि त्यासाठी प्रोत्साहन योजना राबवल्यास ही जात वाचवता येऊ शकते.
कोंबडीचा रस्सा पाहुणचार
मुरबाड तालुक्यात घरी आलेल्या पाहुण्यांना झिनी भाताचा पाहुणचार करण्याची परंपरा आहे. मोठ्या सणाला शेतकरी झिनीचा गोड भात करतो. आलेल्या पाहुण्याला जेवणात झिनीचा भात आणि गावठी कोंबडीचा रस्सा असा बेत आखला जातो. त्यालाच मोठा पाहुणचार समजले जाते; मात्र तांदळाबरोबर ही परंपराही आता नाहीशी होत आहे.
झिनी भात ही मुरबाड तालुक्याची पारंपरिक भाताची जात आहे. हवामानातील बदल, रोगराई आणि उत्पादन घट यामुळे शेतकरी आता हायब्रीड वाणांकडे वळले आहेत. मात्र, या जातीचे संवर्धन गरजेचे आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून झिनी भाताचे वान संवर्धित करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
- रामेश्वर पाचे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, ठाणे
झिनी भाताला रोगराई जास्त लागते; पण तिची चव आणि सुगंध उत्तम आहे. उत्पादन कमी होत असल्यामुळे शेतकरी नवीन हायब्रीड वाणांकडे वळत आहेत.
- दीपक घिगे, प्रगतिशील शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.