कुष्ठरोग निर्मूलनासाठी शोधमोहीम
पनवेल पालिका क्षेत्रात आशासेविका, स्वयंसेवक भेट देणार
पनवेल, ता. १७ (बातमीदार)ः रायगड जिल्ह्यातील कुष्ठरोग्यांची संख्या २०२७ पर्यंत शून्यावर आणण्यासाठी ‘शून्य कुष्ठरुग्ण प्रसार’ उद्दिष्ट आखण्यात आले आहे. याच अनुषंगाने पनवेल महापालिका प्रशासन शहरी भागातील जोखीमग्रस्त लोकसंख्येचे प्रत्यक्ष तपासणी करणार आहे.
महापालिका क्षेत्रात १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत कुष्ठरोग शोधमोहीम अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत आशासेविका, परिचारिका, स्वयंसेवक घरोघरी जाऊन लोकसंख्यंचे सर्वेक्षण करणार आहेत. या मोहिमेदरम्यान शहरी भागातील ३० टक्के जोखीमग्रस्त लोकसंख्येचे प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेत तीन लाख तीन हजार लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी पालिका क्षेत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय विशेष पथकांतर्गत २०३ आशासेविका व ४३ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे घरी येणाऱ्या पथकास नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी केले आहे.